औरंगाबाद : शहरात विविध विकास कामांचे २१ प्रकल्प महापालिकेने हाती घेतले असून, सध्या ९० टक्के कामे पूर्ण होत आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियमचा विकास, सातारा देवळाई आणि गुंठेवारी भागात ड्रेनेज लाइन या पाच मोठ्या विकास कामांसाठी ७८२ कोटींची गरज आहे. यासंदर्भात शासनाकडे निधीची मागणी केली असल्याचे महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी सांगितले.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मनपाकडून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती देण्यात आली. सध्या प्रगतिपथावर असलेली विविध २१ कामे आठ ते दहा महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयासाठी २५ कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी २५ कोटी, गरवारे स्टेडियम येथे हॉकी, बास्केटबॉलसाठी ५० कोटी, देवळाई-सातारा येथे ड्रेनेजसाठी ३२ कोटी, गुंठेवारी भागातील ड्रेनेजसाठी १५० कोटी, असे एकूण ७८२ कोटी रुपये मनपाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे, प्रभारी सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर, कार्यकारी अभियंता विद्युत ए. बी. देशमुख, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते.