औरंगाबाद : सचखंड एक्स्प्रेस रेल्वेमधून प्रवास करताना चोरी झालेल्या ‘एटीएम’ कार्डद्वारे अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या बँक खात्यातून काढलेले ४४ हजार रुपये आयसीआयसीआय बँकेने आणि ९५ हजार रुपये अॅक्सिस बँकेने ९ टक्के व्याजासह एक महिन्यात तक्रारदारास देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला.
तसेच दोन्हीही प्रतिवादी बँकांनी नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी २ हजार रुपये डीडीच्या स्वरूपात एक महिन्यात तक्रारदारास देण्याचा आदेशही मंचच्या अध्यक्ष स्मिता बी. कुलकर्णी आणि सदस्य संध्या बारलिंगे व किरण आर. ठोले यांनी दिला.येथील सैन्य दलातील कर्नल रामेश्वर शर्मा यांच्या पत्नी तक्रारदार अंजना शर्मा १७ सप्टेंबर २०१७ च्या रात्री सचखंड एक्स्प्रेस रेल्वेच्या वातानुकूलित कोचमधून ग्वाल्हेर ते औरंगाबाद असा प्रवास करीत होत्या.
१८ सप्टेंबर २०१७ च्या पहाटे २.४५ वाजता भोपाळ स्टेशनवर तक्रारदार यांची पर्स अज्ञात व्यक्तीने चोरली. त्यातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि डेबिट कार्ड, तसेच अॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड, रोख १५ हजार रुपये, दोन मोबाईल आदी वस्तू चोरी झाल्या होत्या. तक्रारदाराने ताबडतोब रेल्वेमधील ‘अलार्म’ वाजवून मदत मागितली. १०-१५ मिनिटांत रेल्वेचा टीटीई तेथे आला. आरपीएफच्या जवानाने खंडवा रेल्वेस्थानकावर तक्रार नोंदवून घेतली. नंतर पहाटे ५.४५ वाजता कार्ड ब्लॉक केले; मात्र दरम्यानच्या काळात चोरलेल्या एटीएमद्वारे देवास येथून अॅक्सिस बँकेतून एक लाख रुपये आणि मध्यप्रदेशातील सोनकच्छ येथून आयसीआयसीआय बँकेतून ४४ हजार रुपये काढले गेले.
पैसे काढल्याची तक्रार सर्वप्रथम बँक व्यवस्थापकाला पहाटे ३.०० वाजता करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदशर््ाक तत्त्वानुसार (गाईडलाईन) तक्रारदाराने पैसे चोरी झाल्याची तक्रार २४ तासांच्या आत बँकेच्या व्यवस्थापकाकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार या ‘झीरो लाईबिलिटी’ आणि ‘लिमिटेड लाईबिलिटी कस्टमर’च्या लाभासाठी पात्र असल्याचे आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे रक्कम काढण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
पैसे जमा करून खाते केले ब्लॉकअॅक्सिस बँकेने तक्रारदाराच्या खात्यात ९५ हजार रुपये जमा केले; मात्र त्यांचे खाते ब्लॉककरून काही दिवसांनंतर पैसे परत काढून घेतले. वारंवार विनंती करूनही दोन्ही बँकांनी पैसे परत न केल्यामुळे त्यांनी अॅड. सुनील आर. चावरे पाटील यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.