औरंगाबाद : सिडको-हडको भागातील काही गल्ल्यांमध्ये पाणीच येत नाही. नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी येत नसल्याने सिडको एन-६ येथील एका महिलेने थेट आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे.
उद्विग्न झालेल्या महिलेच्या मागणीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यातच सिडको एन-६ येथील रहिवासी मंगल श्रीधर चाबुकस्वार यांच्या अजब मागणीमुळे प्रशासन संकटात सापडले आहे. चाबुकस्वार यांचे घर उतारावर आहे. उतारावर असलेल्या घराला अधिक पाणी मिळते, मात्र तरीही गेल्या वर्षभरापासून पाणी येत नाही, त्यामुळे त्यांनी वर्षभरापासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. चाबुकस्वार यांनी पहिली तक्रार २० ऑक्टोबर २०२१ रोजी केली, त्यानंतर १० डिसेंबर, पुन्हा १७ डिसेंबर, २८ मार्च, ४ एप्रिल, १८ एप्रिल आणि ९ मे २०२२ रोजी निवेदन दिले.
सात महिन्यांत तब्बल सात वेळा निवेदन दिल्यानंतरही नळाचे काम केले जात नाही. त्यांना शेजाऱ्यांकडे पाणी मागण्यासाठी जावे लागते, मुळात पाणीच कमी येत असल्याने शेजारीही पाणी देत नाहीत. महापालिकेकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितले जात आहेत. नळाची दुरुस्ती करावी अन्यथा आम्हाला सहकुटुंब आत्महत्येची तरी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सांगितले की, मंगल चाबुकस्वार यांच्या तक्रारी संदर्भात संबंधित उपअभियंता यांना तत्काळ निवारण करण्यासाठी आदेशित करण्यात आलेले आहे. लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. नागरिकांनीही एवढ्या टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. पाणीपुरवठ्यात अडचणी आहे, त्या हळूहळू दूर केल्या जात आहेत.