चिकलठाणा विमानतळावरील इमारतीत वेधशाळा आहे. विमानतळाच्या परिसरातच हवामान खात्याची निवासस्थाने आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून आठवड्यातून ३ दिवस पाणीपुरवठा होतो. विमानतळासमोर जालना रोडलगत असलेली जलवाहिनी फुटल्याने, या निवासस्थानांना गेल्या ८ दिवसांपासून पाणी येत नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधूनही प्रश्न सुटत नाही. वेधशाळेतील कर्मचाऱ्यांना, कुटुंबीयांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील अन्य लोकांकडून पाणी घेण्याची वेळ येत आहे. विमानतळ प्रशासनही पाणी देत नाही. विमानतळाकडून आधी पाणी पुरविले जात होते, पण ते बंद झाले. मनपाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर कामबंद करू, असे हवामान सहायक सुनील निकाळजे म्हणाले. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे म्हणाले, हवामान विभाग आमच्या अंतर्गत नाही. त्यांची निवासस्थाने विमानतळाच्या परिसरात आहे, पण या निवासस्थानांना मनपाकडून पाणीपुरवठा होतो.
पाणी द्या, अन्यथा विमान उतरू शकणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:04 AM