छत्रपती संभाजीनगर : 'गेल्या वर्षी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजपैकी २९ हजार कोटींची कामे सुरू आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम ध्वजारोहणानंतर दिली. यावर '४६ रुपयाचे काम आहे दाखवा, एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ', असे आव्हान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संदिपान भुमरे खासदार डॉक्टर भागवत कराड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे. यांच्यासह प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोलीचेही पालकमंत्री असल्याने ते येथील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
शिंदेंनी मराठा समाजाला काय केले आवाहन?
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मराठा समाजासाठी आतापर्यंत घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे मराठा समाजाने सुद्धा सौजन्याची भूमिका दाखविली पाहिजे. सरकारच्या काळामध्ये मराठवाड्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केला आहे."
मुख्यमंत्री म्हणाले, "मराठवाड्यात अनेक उद्योगांशी करार केलेले आहे. विविध योजनांमुळे मराठवाड्यामध्ये अनेक बदल आगामी काळात दिसतील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून मागील दहा वर्षात देशाचा आर्थिक स्तर उंचावला", असा दावा मुख्यमंत्री यांनी केला.
सगेसोयरेचा जीआर काढण्याचे काम सुरू -शिंदे
मराठा आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "हैद्राबाद गॅजेट, सगेसोयरे या संदर्भात जीआर काढण्याचे काम सुरू आहे. शिंदे समिती सरकारने नेमली होती. कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल. यावर शिंदे समिती व इतर समित्या देखील काम करत आहेत. समाजाची दिशाभूल होणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचे काम सरकार करेल. त्यामुळे मराठा समाजाने देखील शासनाला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे."
लाडक्या बहिणी जोड्याने मारतील; शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
महामंडळाच्या नियुक्ती बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "सर्वांना समान महामंडळाचे वाटप झालेले आहे , समन्वयाने निर्णय झालेला आहे. आमच्यात त्यावरून कुठलाही संघर्ष नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा आणणाऱ्यांनाच या बहिणी जोड्याने मारतील. येणाऱ्या काळामध्ये विविध कल्याणकारी योजना, सरकारने घेतलेले निर्णय आणि आजपर्यंत केलेल्या विकास कामाची पोहोच पावती महायुतीला निवडणुकीत मिळेल", असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.