खबरदारी : रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका आधीच ओळखला, औषधी बंद केल्याने होते गुंतागुंत
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्यांत गाठी होण्याचा धोका वाढत असल्याचे सांगितले जाते; परंतु हा धोका घाटीतील डॉक्टरांनी खूप आधीच ओळखला होता. येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु घरी गेल्यानंतर रुग्ण स्वत:च्या मनाने औषधी घेणे बंद करीत असल्याने गुंतागुंत वाढून पुन्हा रुग्णालयात यावे लागत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या करोनाग्रस्तांच्या शरीरात डी-डायमर प्रथिनाची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात. त्यावर रक्त पातळ करण्याचे औषध प्रभावी उपचार ठरत असल्याचे निरीक्षण कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यानुसार घाटीत कोरोना रुग्णांना ही औषधी दिली जातात.
फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यांत अशा गुठळ्या झाल्यास दम लागणे, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे, त्याचप्रमाणे न्यूमोनियासारखी लक्षणे दिसतात. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर अनेक रुग्ण औषधी स्वत:च्या मनाने बंद करून टाकतात. त्यातून रुग्ण पुन्हा गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात. घाटीत अशा प्रकारे काही रुग्ण दाखल झाले. रक्तवाहिन्यांतील गाठीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नियमितपणे औषधी घ्यावी
घाटीत पहिल्या रुग्णापासून रक्त पातळ होणारी औषधी दिली जात आहेत. ही औषधी महत्त्वपूर्ण ठरतात; परंतु अनेक जण घरी गेल्यानंतर औषधी बंद करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतली पाहिजे. कमीत कमी ३ महिने औषधी, उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
-डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी