औरंगाबाद : विविध क्षेत्रात नेतृत्वगुणांची चमक दाखवून स्वत: बरोबर समाजाचाही विकास साधणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे नाव पुकारले जात होते... सोबतच त्यांच्या उत्तुंग कार्याची माहिती सांगितली जात होती. तेव्हा मनात उत्सुकतेसह आपल्या कार्याची, मेहनतीची दखल घेतल्याचा अधिक आनंद होता. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते ‘लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड’ स्वीकारताना त्या कर्तबगार महिलांना ‘आकाशाला गवसणी’ घातल्याचा आनंद झाला होता.
आमच्या कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली, हाच आमच्यासाठी पद्मश्री पुरस्कार होय, अशी उत्स्फूर्त भावना कर्तृत्ववान महिलांनी यावेळी व्यक्त केली.
संसार सांभाळून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या मराठवाड्यातील ३० महिलांना बुधवारी (दि. १) ‘लोकमत वूमन ॲचिव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने लोकमत भवनात पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अभिनेत्री आदिती सारंगधर, ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील, महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा व ईव्हेंट हेड रमेश डेडवाल यांच्या हस्ते ‘लोकमत ॲचिव्हर्स अवाॅर्ड कॉफीटेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले.
विविध क्षेत्रात यशाची नाममुद्रा उमटविलेल्या पुरस्कारप्राप्त महिला आपल्या कुटुंबासमवेत लोकमत भवनात दाखल झाल्या होत्या. यामुळे सोहळ्याला कौटुंबिक किनार आली होती. आपल्या परिश्रमावर यशाची मोहोर लागणार, पुरस्कार मिळणार या विचाराने त्या सद्गतीत झाल्या होत्या. जेव्हा त्यांची नावे पुरस्कारासाठी घोषित केली जात होती, तेव्हा उपस्थित टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या कार्याला सलाम करीत होते. जेव्हा या महिला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत होत्या तेव्हा त्यांच्यातील काही भावुक झाल्या. त्या आनंदाश्रूला रोखू शकल्या नाहीत. हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे, अशा उत्स्फूर्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांचे पती, मुले या सोहळ्याचा प्रत्येक क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते. लगेच सोशल मीडियावर शेअर करीत होते. त्यास लाईक मिळणे सुरू झाले की, ते एकमेकांना दाखवून आनंद व्यक्त करीत होते. पुरस्कारात ‘ट्रॉफी, कॉफीटेबल बुक’ दिले जात होते. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारे समाधान शब्दातीत होते.
(जोड)