छत्रपती संभाजीनगर : आपले छत्रपती संभाजीनगर शहर हे ऑप्टिकल फायबर निर्मितीमध्ये देशाची राजधानी बनले आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीतून संपूर्ण देशाला आणि अमेरिकेसह विविध देशांना ऑप्टिकल फायबरचा पुरवठा होत असल्याची माहिती स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे स्ट्रॅटेजी ॲण्ड चीफ ऑफ स्टाफ संचालक विजय आगाशे यांनी दिली.
चेम्बर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरच्या वतीने (सीएमआयए) शुक्रवारी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘इनोव्हेट इंडिया- पायोनियरिंग एक्सलन्स इन इंडस्ट्री' या सीईओ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्क्लेव्हची ही चौथी आवृत्ती होती. या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, उत्सव माछर, रिशिका अग्रवाल आणि कॉन्क्लेव्ह निमंत्रक सौरभ छल्लानी यांच्या उपस्थितीत पार पडले. आगाशे म्हणाले की, डिजिटल क्रांतीमध्ये भारतातील ८० दशलक्ष लोक रोज नवीन डेटानिर्मिती करीत असतात. देशातील शंभरहून अधिक शहरांना ऑप्टिकल फायबरचा पुरवठा वाळूजमधील स्टरलाइट कंपनीतून होतो.
यावेळी एरिज ॲग्रो लि.चे व्यवस्थापकीय संचालक राहुल मीरचंदानी यांनी कृषी क्षेत्रातील नावीन्य अधोरेखित करताना, आपल्या उत्पादनालाच आपले ‘सेलिब्रिटी’ करावे, असे मत व्यक्त केले. पार्टनर आणि लीडर सेल्स, अलायन्सेस अँड पर्सुइट एक्सलन्स, डेलॉइट दक्षिण आशियाचे विनय प्रभाकर यांनी उद्योग क्षेत्रात प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण यावर जोर असला पाहिजे, त्याच वेळी उत्पादन शाश्वत असण्यावर जोर असला पाहिजे, असे मत व्यक्त केले. अथर्वेश नंदावत यांनी सूत्रसंचालन केले. कॉन्क्लेव्ह निमंत्रक सौरभ छल्लानी म्हणाले की, ही परिषद तंत्रज्ञान आणि नावीन्याच्या साहाय्याने भारताची क्षमता विकसित करणे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इंडस्ट्री ४.० आणि शाश्वततेच्या केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आली.
उद्योगांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध - भागवत कराडडॉ. भागवत कराड यांनी भारत सरकारकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी बारा बलुतेदारांना त्यांचा व्यवसायवाढीसाठी प्रत्येकी ३ लाख रुपये देण्यात येत असल्याचे नमूद केेले. येथे नवीन उद्योग येण्यासाठी सीएमआयएकडून होत असलेल्या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थितांशी ऑनलाइन संवाद साधला. गृहनिर्माणमंत्री सावे यांनीही मनोगत व्यक्त केले.