- राम शिनगारे
औरंगाबाद : अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील विविध विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या दोन टक्के शास्त्रज्ञांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मेटेरिअल सायन्स विषयात औरंगाबादेतील विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. सागर शिरसाठ यांचा समावेश केला आहे.
डॉ. शिरसाठ हे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्थ याठिकाणी दोन वर्षे रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी केलेल्या संशोधनाच्या आधारे हा समावेश करण्यात आला. विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. शिरसाठ यांनी २०१० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात डॉ. के.एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले. यानंतर त्यांना २०१२ मध्ये जपान सरकारने प्रतिष्ठेची ‘जपान सोसायटी फाॅर द प्रमोशन ऑफ सायन्स’ (जेएसपीएस) ही शिष्यवृत्ती जाहीर केली होती. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते मराठवाड्यातील एकमेव संशोधक होते.
२०१४ मध्ये जपानहून परत आल्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी येथे असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्थ’मध्ये २०१७ ते १९ या कालावधीत रिसर्च सायंटिस्ट म्हणून नियुक्ती झाली. याठिकाणी त्यांनी ‘नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी’त या विषयात संशोधन केले. याशिवाय रेकॉर्डिंग, मीडिया आणि एनर्जी विषयात संशोधन केले. याची दखल स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १८० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. यातील त्यांच्या एका पेपरला १५ इम्पॅक्ट फॅक्टर आहे, तसेच एकूण एच. इंडेक्स ४५ एवढा आहे. त्यांच्या पेपरचा आतापर्यंत ५ हजार ५०० संशोधकांनी वापर केला असल्याची माहितीही डॉ. शिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
निवडीने अधिक उर्जा मिळाली ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्थमधील माझ्या प्रोफेसरला स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून मेलद्वारे माझ्या समावेशाची माहिती देण्यात आली. यानंतर मला माहिती कळाली. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या मटेरिअल सायन्समधील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत केलेल्या समावेशामुळे संशाेधन करण्याची अधिक ऊर्जा मिळाली आहे.-डॉ. सागर शिरसाठ