छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्यांच्या कार्यशैलिक बदल होऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी राज्य सरकारने पोलिस ठाण्यांचे मुल्यांकन सुरू केले. त्यातून दरवर्षी पाच सर्वोत्कृष्ठ पोलिस ठाणे निवडण्यात येते. यात सलग दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर च्या वाळुज पोलिस ठाण्याने सन्मान पटकावला. सोमवारी मुंबई मध्ये वाळुज चे तत्कालिन निरीक्षक संदिप गुरमे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह स्विकारले.
शहाण्यानेही पोलिस ठाण्याची पायरी चढू नये, असे म्हणतात. कायदेशीर कचाट्यामुळे असे म्हटले जात असले तरी पोलिस ठाण्यांमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे देखील सामान्यांमध्ये अनेकदा पोलिस ठाण्याची वाईट छबी पहायला मिळते. त्या धर्तीवर पोलिस ठाण्यांमधील कार्यशैलित बदल व्हावा, कायदा व सुव्यवस्थेसाठी योग्य व परिणामकारक पाऊले उचलले जावी, ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून शिस्तबध्द कर्तव्याचे पालन व्हावे, गुन्हे प्रतिबंध, गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी सात वर्षांपूर्वी वरीष्ठ पातळीवर या मुल्यांकनाचा निर्णय घेण्यात आला. देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यांचा समावेश व्हावा, यादृष्टीने राज्य पातळीवर प्रयत्न करण्यात आले. निवड झालेल्या पोलिस ठाण्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्री व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान देऊन सन्मानित करण्यात येते.
२०२० मध्ये राज्यात या मुल्यांकन स्पर्धेला प्रारंभ झाला. सर्वोत्कृष्ट पाच पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. पहिल्याच स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलिस ठाण्याचा समावेश होता. २०२१ च्या मुल्यांकनामध्ये देखील वाळूज पोलिस ठाण्याचे सर्वोत्कृष्ठ ठाण्यामध्ये मजल मारत आपला दर्जा कायम ठेवला. तत्कालिकन पोलिस निरीक्षक संदिप गुरमे यांनी याची सुरूवात केली. त्यानंतर रुजू झालेले निरीक्षक सचिन इंगोले यांनी त्यात सातत्य ठेवले. सोमवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरमे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे- शिवाजीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर)- देगलूर पोलिस ठाणे (नांदेड)- वाळूज पोलिस ठाणे (छत्रपती संभाजीनगर शहर)- अर्जुनी मोर पोलिस ठाणे (गोंदिया)- राबोडी पोलिस ठाणे (ठाणे शहर)