- संजय जाधवपैठण : ग्रामीण भागात आज विविध वाहने पोहोचली असली तरी बैलगाडी या वाहनाने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. शेतकरी व बैलगाडी यांचे नाते युगायुगापासून आहे व आजही टिकून आहे. पैठण येथे नाथषष्ठीनंतर भरणाऱ्या पारंपरिक बैलगाडी बाजारात बैलगाडी घेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. यंदाही बैलगाडी विक्री चांगली होत आहे, असे बाजारातील व्यापा-यांनी सांगितले.
पैठणच्या बैलगाडी बाजारास सुमारे ६० वर्षांची परंपरा आहे. नाथषष्ठीला बैलगाड्या घेऊन व्यापारी येथे येतात. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत व्यापारी पैठण येथे थांबतात. शेतीक्षेत्रात विविध आधुनिक बदल झाले. कृषी साहित्य तंत्रज्ञान बदलत गेले. मात्र बैलगाडीस पर्याय निर्माण होऊ शकला नाही. शेतातून, चिखलातून व कशाही रस्त्यावर चालणा-या बैलगाडीने शेतक-यांची व शेतक-यांनी बैलगाडीची साथ कधीच सोडली नाही.
लोखंडी व लाकडी बैलगाडीलोखंडी व लाकडी अशा दोन प्रकारच्या गाड्या विक्रीला असतात. नवीन बैलगाडी विकत घेताना तिची काळजीपूर्वक पाहणी करावी लागते. बैलगाडी घेण्यासाठी चार ते पाच जणांना शेतकरी सोबत आणतात. यात ज्येष्ठ व अनुभवी शेतकरीच बैलगाडी खरेदी प्रक्रिया करतात, असे निदर्शनास आले आहे.
लाकडी बैलगाडीसाठी ‘तिवसा’चा वापरबैलगाडीचे व्यापारी जळगाव जिल्ह्यातून पैठण येथे दरवर्षी येतात. याबाबत बोलताना व्यापारी किसन राऊत यांनी सांगितले की, लोखंडी बैलगाडी वापरण्यास चांगली आहे. मात्र ऊन्हामुळे लोखंड प्रचंड तापते तर थंडीत आकुंचन पावते. यामुळे शेतकरी व बैलांना त्रास होतो, ही बाब लक्षात आल्याने पारंपरिक लाकडी बैलगाड्यांची मागणी वाढली आहे. तिवसा या जातीचे लाकूड बैलगाडी बनवण्यासाठी वापरतात असेही त्यांनी सांगितले.
व्यापा-यांच्या अनेक व्यथाबैलगाडीची १२ ते १८ हजार रुपये अशी किंमत यंदा आहे. बाजारात जवळपास २०० ते २५० बैलगाड्यांची यंदा विक्री झालेली आहे. बैलगाडीची लांबी व रुंदी यानुसार गाडीची किंमत केली जाते. बैलगाडीसाठी लाकुड मिळत नाही. यामुळे लाकडाचे दर वाढलेले आहेत. त्यात कुशल मजूर व बैलगाडी वाहतुकीचा प्रश्न जिकरीचा झाला आहे. अशा अनेक व्यथा बाजारातील व्यापाºयांनी बोलून दाखविल्या.