- विजय सरवदे
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदांसाठी राबविण्यात आलेल्या मेगाभरतीमध्ये आरोग्य सेविका पदासाठी पात्र ठरलेल्या तीन वर्षांचा ‘जीएनएम’ कोर्सधारक महिलांना कागदपत्रे पडताळणीवेळी अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, दोन वर्षांचा ‘एएनएम’ कोर्सधारक महिलांना मात्र, जि.प. आरोग्य विभागाने पदस्थापना दिली आहे. ही परीक्षा घेणाऱ्या ‘आयबीपीएस’ या खासगी संस्थेच्या चुकीमुळे पात्र ठरल्यानंतरही राज्यभरातील अनेक ‘जीएनएम’धारक महिलांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे.
राज्यभरातील जिल्हा परिषदांतील रिक्त पदांसाठी मेगा भरती राबविण्याची जबाबदारी ‘आयबीपीएस’ या संस्थेवर होती. या संस्थेने विविध संवर्गासाठी अर्ज मागविले. अर्जांची पडताळणी केली. ऑनलाइन परीक्षा घेतली. निकालही जाहीर केले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. ते अलीकडे जाहीर झाले. गेल्या आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र आरोग्य सेविकांची कागदपत्रे तपासली. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र ६८ ‘जीएनएम’ कोर्सधारक महिलांना या पदासाठी तूर्तास अपात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविले आहे, तर अन्य जिल्ह्यांत अशा ‘जीएनएम’ कोर्स धारक महिलांना थेट अपात्रच ठरविण्यात आले आहे.
परीक्षेत ६४ महिला नापासजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील २४४ रिक्त आरोग्य सेविका पदांसाठी परीक्षा झाली होती. त्यामध्ये १८० महिला उत्तीर्ण झाल्या, तर ६४ जणी नापास झाल्या. यापैकी उत्तिर्णांमध्ये ६८ ‘जीएनएम’ कोर्सधारक महिलांचा समावेश आहे. सोमवारी १०९ महिलांना आरोग्य सेविका व ५ आरोग्य सेवक पदांसाठी पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्यात आली. तालुकानिहाय दिलेली पदस्थापना अशी, छत्रपती संभाजीनगर - ३, खुलताबाद - ३, कन्नड - १५, गंगापूर - १५ (आरोग्य सेवक-१), वैजापूर - २१- (आरोग्य सेवक- २), पैठण -२०, फुलंब्री - ३, सिल्लोड -१५, सोयगाव - ८ (आरोग्य सेवक २), ५ आरोग्य सेविका अनुपस्थित होत्या.