औरंगाबाद : शहरात कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल दोन दिवसांनंतरही मिळत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे संशयितांना क्वारंटाईन सेंटरमध्येच राहावे लागत असून, या रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची घालमेल होत आहे.
एन-२ येथील एका कुटुंबाने १३ जुलै रोजी एमजीएम येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे स्वॅब दिले होते; परंतु त्यांना अहवालाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. विद्यापीठात क्वारंटाईन असलेल्या सेव्हन हिल परिसरातील एका कुटुंबातील तिघांनाही दोन दिवसांपासून अहवाल मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. शहरात असाच प्रकार अन्य संशयित रुग्णांसोबत होत आहे.
स्वॅब नमुने घेतल्यानंतर २४ तासांत अहवाल येणे अपेक्षित आहे; परंतु शहरात अनेकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. संशयित रुग्णांना क्वारंटाईन केल्यानंतर दोन दिवस उलटूनही अहवाल मिळत नाही. यातून जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या उपचाराला विलंब होण्याची शक्यता आहे.
जेथे स्वॅब दिला तिथे जा...मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अन्य अधिकाऱ्यांनी फोन घेतला. त्यांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांचे उत्तर,‘ जिथे स्वॅब दिला तिथे विचारणा करा,’ असे अजब उत्तर होते. जर एखादा संशयित क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असेल, तर त्याने कशी विचारणा करावी, असा प्रश्न होत आहे. त्यामुळे व्यक्ती क्वारंटाईन असली तरी त्यांच्यावर चिंतेची टांगती तलवार कायम आहे.