औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत फळभाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी दुपारी एका शेळीने गच्चीवरुन पत्र्याच्या शेडवर उडी मारली आणि सारा गोंधळ उडाला. तिला वाचविण्यासाठी पाच ते सहा युवकांनी प्रयत्न सुरु केले पण ती कोणाच्या हातीच लागेना. एवढेच नव्हे तर तिने उडी मारली तर तिला पकडण्यासाठी शेकडोजण खाली उभे होते. तासभर त्या शेळीने सर्वांना हुलकावणी देत शेडवर ईकडून तिकडे पळत राहिली अखरे तिला पकडण्यात युवकांना यश आले. आणि शेळीला सुखरुप दुकानांच्या गच्चीवरुन खाली आणण्यात आले. मात्र, यानिमित्ताने जमलेल्या व्यापा-यांना शोले चित्रपटातील ‘वीरूगिरी’ची आठवण झाली.
जाधववाडीत फळभाजीपाल्याचा आडत बाजारात फेकून दिलेल्या फळभाज्या खाण्यासाठी शेकडो मोकाट जनावरे फिरत असतात. म्हशी,बैल, गायी व शेळ्यांचा त्यात समावेश असतो. येथील आडत दुकानांच्यासमोर ओट्यावर शेतीमाल ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी ११ ते ११.१५ वाजेच्या सुमारास दुकाननंबर १११ व ११२ च्या वरील पत्र्याच्या शेडवर मोठा आवाज आला. यामुळे घाबरलेल्या व्यापारी व हमालांनी दुकानाच्या बाहेर धाव घेतली. तर त्यांना शेडवर बकरी दिसून आली. ही बकरी जिन्यामधून गच्चीवर गेली होती. गच्चीवरील भिंतीवर चढून तिने दुकानासमोरील पत्र्याच्या शेडवर उडी मारली. मात्र, तिथून तिला खाली उडी मारता येईना व भिंतीची उंची जास्त असल्याने तिथेही चढता येईना.
तिला वाचविण्यासाठी पाच ते सहा युवक गच्चीवर गेले. आधीच घाबरलेल्या शेळीने मग पत्र्यावरुन पळणे सुरु केले आणि पुन्हा दुकाननंबर ११२ पर्यंत आली तिथे पुढे नव्हता पत्र्याच्या काठावर येऊन तिने ओरडने सुरु केले. खाली तिला वाचविण्यासाठी तो पर्यंत शेकडो लोक जमा झाले होते. वरतून ती खाली पडली तर काही जणांनी तिला वरतीच झेलण्याची तयारीही केली होती. तोपर्यंत दोन युवक शेडवर चढले त्यांना पाहून शेळी पुन्हा शेडवरून ईकडून-तिकडे पळू लागली. त्यात ती अनेकदा पत्र्याच्या काठावर येऊन थबकत होती. खाली उडी मारते की काय, या भीतीने अनेकांची हृदयाचे ठोके वाढले होते. अखेर १२.०५ वाजेदरम्यान चार युवकांनी तिला पकडले व सुखरुप खाली आणून सोडले. उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला.
आत्महत्या करायला ती काय मनुष्य आहे ? पत्र्याच्या शेडवर पडलेल्या बकरीला वाचविण्यासाठी काही युवक प्रयत्न करीत होते तेव्हा ति अनेकदा पळता-पळता शेडच्या काठावर येऊन थांबत होती. खाली उभे असणा-या अनेकांना ति खाली पडते काय अशी भीती वाटत होती. त्यातही कॉमेंटबाजी झाली. एक जण म्हटला ‘वह आदमी थोडी है क्या कुदने के लिए.’ दुसरा म्हणाला ‘ वह जान नही देंगी’. तिसरा म्हणाला ‘जान तो आदमी देता है व बकरी हर हलात मे जिने का सोचेगी’ या कॉमेंटमुळे उपस्थितांमध्ये हास्य पिकले.