औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील उघड्या ड्रेनेज चेंबरमध्ये १८ वर्षीय पादचारी तरुण पडला. दक्ष नागरिकांनी अवघ्या ३० सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले. जयभवानीनगरात रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
जय भवानीनगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या योजनेतून हे काम करण्यात येत आहे. जय भवानीनगर चौकात दरवर्षी पावसाळ्यात चारही बाजूने विविध वसाहतींमधील वाहून येणारे पाणी जमा होते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी येथे ६०० मि.मी. व्यासाची ड्रेनेजलाईन टाकण्यात येत आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. मुख्य रस्त्यावरील उघडे ड्रेनेज चेंबर पाण्यात बुडाले. याच भागात राहणारा तरुण मोरेश प्रकाश सूळ (१८) हा पायी जात असताना अचानक या ड्रेनेज चेंबरमध्ये पडला. हे दृश्य परिसरात उभ्या नागरिकांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करून मोरेश याला वाचविण्याचा प्रयत्न केला. २० फूट अंतरावरील दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढण्यात आले. नशीब बलवत्तर असल्याने मोरेश बालंबाल बचावला. अवघ्या तीस सेकंदाच्या घटनेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
दोन वर्षांपूर्वी याच पद्धतीने व्यक्तीचा मृत्यूदोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर राजकीय मंडळींनी प्रचंड टीकेची झोड उठवली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आताही या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पूल उभारण्याची मागणी करण्यात येत असताना फक्त दोन पाईप टाकून काम उरकण्याचा प्रयत्न मनपाकडून सुरू आहे, असा आरोप माजी नगरसेवक बालाजी मुंडे यांनी केला.