ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद /वैजापुर : नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी आज दुपारी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत धडकले.सकाळीच डोणगाव शिवारात येवून धडकलेल्या या पाण्याला तीव्र गती आहे . यामुळे गोदा पात्रालगतच्या वैजापूर तालुक्यातील सतरा गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीतील पाण्याची ही गती कायम राहिल्यास रात्रीतून हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोदावरी काठच्या गावातील ग्रामस्थांनी या पाण्याचे मोठ्या उत्साहात जलपूजन करून समाधान व्यक्त केले.
शुक्रवारी व शनिवारी नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात वरुणराजा मनसोक्त बरसला. या दोन दिवसात नाशिकमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला होता.शनिवारी दुपारी नांदूरमधमेश्वरमधून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले. त्यातच नाशिक परिसरातील कड़वा ( सिन्नर ), गंगापुर धरण व धारणा धरणातील पाणी नदीत दाखल होत होते. त्यामुळे गोदानदी पात्रात सायंकाळी ६१ हजार १३८ क्युसेकने पाणी धावत होते.
दरम्यान हे पाणी वैजापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास येवून धडकले. ते पुढे बाबतारा, लाखगंगा, पुरणगाव पार करीत जायकवाडीकडे वेगाने झेपावत आहे. पाण्याची गती पाहता रात्रीतून हे पाणी जायकवाडीत पोहचेल.
नाथसागरात सोमवारी धडकणार !
नदीतील पाण्याची गती वाढत असल्याने सोमवारी पहाटे हे पाणी पैठणच्या नाथसागरात जावून पोहोचेल असा अंदाज पाटबंधारे विभागा कडून व्यक्त केला जात आहे.
अनेक गावांचे संपर्क तुटले
पाण्याचा प्रवाह नदीपात्र ओसाडून वाहू लागल्याने.सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरला जोडणाऱ्या शिऊर-श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते.पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने डोणगाव,बाबतारा,लाखगंगा,बाभूळगावगंगा,भालगाव,नांदूरढोक या गावांना जोडणारे अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने त्यांचा
अन्य गावांशी संपर्क तुटला आहे
प्रशासन अलर्ट !
प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून.परिसरातील सर्व मंडळ अधिकारी,तलाटी व ग्रामसेवकाचे सुट्या रद्द करण्यात आले असून त्याना मुखयलायी राहन्याचे सुचना करण्यात आले असल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.
या गावांना सतर्कतेचा इशारा !
तालुक्यातील गोदाकाठा वरील वांजरगाव,डाक पिपळगाव,डोंणगाव,पुरणगाव,बाबातारा,बाबूळगावगंगा,नांदुरढोक,सावखेडगंगा,भालगाव,नागमठान,चांदेगाव,बाजारठान,चेंडूफळ,अव्वलगाव व शनि दहेगांव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.