औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी व परिसरात १० हेक्टर जागेवर रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरणदिनी (५ जून) सुमारे ६ हजार २५० देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. यामुळे हा भाग ऑक्सिजन हब बनेल. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात कास पठाराच्या धर्तीवरच विविध फुलांच्या रोपांची लागवड टेकडी परिसरात करून हा भाग ‘झकास पठार’ करण्याचा संकल्प असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले.
५ जून रोजी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या सर्व नियमावलींचे पालन करीत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या सूचनेप्रमाणे गोगाबाबा टेकडी परिसर हिरवागार करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून सामाजिक वनीकरण विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून वनरोपण संवर्धन दर्जा असलेल्या ठिकाणी पुनर्रोपण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या रोप लागवडीत देशी प्रजातींना महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, पापडा, बांबू, आंबा, रामकाठी बाभूळ, हिवर, लिंब, शिसू, खैर, पळस, आमलतास, शिरस आदी प्रजातींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे.
साताऱ्यातून आणणार रोपे आणि बी-बियाणेया रोपांचे तीन वर्षे संवर्धन शासनामार्फत करण्यात येणार असून, वृक्षांच्या संवर्धनासाठी तारांचे कुंपण करण्यात येणार आहे. जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून कास पठाराच्या धर्तीवर ‘झकास पठार’ तयार करण्यात येणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. जि.प.ची एक टीम कास पठार येथे भेट देऊन तेथील विविध प्रजातींची आकर्षक फुलांची रोपे, बी आणणार असल्याचेही ते म्हणाले.