लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ या भजनात सारे हरखून गेले होते... मध्यरात्री १२ वाजले आणि साऱ्यांनी ‘भगवान श्रीकृष्ण की जय’ असा जयघोष करीत जन्माष्टमी उत्सव साजरा केला... रविवारी शहर श्रीकृष्णमय झाले होते. भक्ती-शिस्तीचा अनोखा सोहळा सर्वांनी अनुभवला.पैठण रोडवरील महानुभाव आश्रमातील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे ५ वाजेपासून अभिषेकाला सुरुवात झाली होती. भगवंतांच्या मूर्तीला भरजरी वस्त्रे, दागिन्यांनी सजविण्यात आले होते. भगवंतांच्या मूर्तीसमोरच विविध फुलांनी पाळणा आकर्षकरीत्या सजविण्यात आला होता. गाभाराही रंगीबेरंगी फुले व पानांनी सजविला होता. सकाळी ७ वाजता शेकडो भाविकांनी श्रीमद् भगवतगीतेचे एकसाथ वाचन केले. त्यानंतर याच मंदिरात शालेयस्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी ‘कृष्णलीला’चे वर्णन केले. आसपासच्या पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी दिवसभर येथे श्रीकृष्णाची स्तुतीपर भजने सादर केली. रात्री ८ वाजता भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली होती की, भव्य मंदिरही अपुरे पडले. ११.३० वाजता श्रीकृष्णजन्म अध्यायाचे सामूहिक वाचन करण्यात आले. सजविलेल्या पाळण्यात बालश्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली. मध्यरात्री १२ वाजता पाळणा, आरती म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.घरोघर गोकुळाष्टमीएकीकडे मंदिरांमध्ये भव्य-दिव्य धार्मिक कार्यक्रम आणि दुसरीकडे घरोघर गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यासाठी बाजारात विशेषकरून गुजरातमधून आलेल्या ३५० लहान-मोठ्या आकारातील लाकडी पाळण्यांची विक्री झाली. अनेक घरांमध्ये या लाकडी पाळण्यातच श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. सिडकोमध्ये गोकुळाष्टमी साजरी करताना भंडाºयाचेही आयोजन करण्यात आले होते.राधाकृष्ण मंदिरात महोत्सवआंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने सिडको एन-१ येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. तर ४०० पेक्षा अधिक भाविकांनी अभिषेक केला. सायंकाळपासून येथे भाविकांची मोठी रांग लागली होती. काही ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्याने प्रत्येकाला भगवंतांच्या अभिषेकाचे लाईव्ह दृश्य पाहता येत होते. बहुतांश भाविक रांगेत उभे राहून ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे’चा नामोच्चार करीत होते. मध्यरात्री १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. महोत्सव यशस्वीतेसाठी अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, संजय मंत्री, डॉ. यशवंत नाडे, अनिल गोयल, राजेश भारुका, राजेश भट्ट, डॉ. सतीश उपाध्याय, विजय अग्रवाल, किशोर राठी, श्रीकांत जोगदंड आदी पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.अग्रवाल सभातर्फे जन्माष्टमी उत्साहातअग्रवाल सभा व अग्रवाल युवा मंचयांच्या वतीने सिडकोतील अग्रसेन भवन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लहान मुले बाळगोपाळाच्या वेशभूषेत आली होती.श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेतील मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी अग्रवाल सभेचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल तसेच रतनलाल अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, जगदीश अग्रवाल, प्रदीप बगडिया यांनी दीप प्रज्वलन करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर दहीहंडी फोडण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अग्रवाल महिला समितीच्या अध्यक्षा सुनीता अग्रवाल, सविता अग्रवाल, युवा मंचचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, अनुप अग्रवाल, बहुबेटी मंडळाच्या अध्यक्षा नीतू अग्रवाल, पूजा अग्रवाल, अग्रसेन भवन अध्यक्ष संजय टिबडीवाला, विजय अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.
बाळकृष्णाच्या भक्तीत शहर दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:21 AM