आरोग्यास धोका: प्रदूषण व दुर्गंधीचा त्रास वाढला
वाळूज महानगर : गोलवाडी शिवारात असलेल्या छावणी परिषदेच्या कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. या डेपोच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
छावणी परिषदेच्या जागेवरील या कचरा डेपोत लष्कर परिसर व छावणी हद्दीतून निघणारा केर-कचरा बालाजी मल्टी सर्व्हिसेस मार्फत जमा करुन या ठिकाणी आणून टाकला जात आहे. जमा झालेल्या कचऱ्यावर प्रकिया करून खतनिर्मिती करण्यात येते. या कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठ-मोठे ढिगारे साचत असतात. या कचऱ्याबरोबर मृत प्राणीही आणून टाकले जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. डेपोत जमा झालेला कचरा चोरून जाळला जात असल्याचा आरोप म्हाडा कॉलनी, साऊथसिटी, भारतनगर आदी भागातील नागरिकांना केला आहे. पावसाळ्यात कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असते. चार दिवसांपूर्वी या कचरा डेपोला अचानक आग लागल्यामुळे या परिसरातील अनेक झाडेही होरपळली होती. याच बरोबर दोन दिवस धुरामुळे नागरिकांना घरे व खिडक्या बंद कराव्या लागल्या होत्या. या कचरा डेपोमुळे प्रदूषण वाढत चालले असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश बिरंगळ, प्रवीण हांडे, नरेंद्र यादव, नानासाहेब बडे, शीतल गंगवाल, नीलेश भारती आदींनी छावणी परिषदेच्या सीईओ यांना निवेदनही सादर करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.
नागरिकांच्या आरोग्यास धोका
या कचरा डेपोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांत असंतोष आहे.
फोटो ओळ- गोलवाडी शिवारातील कचरा डेपोमुळे प्रदूषण वाढत चालले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
फोटो क्रमांक- कचरा डेपो १/२
-------------------