सुनील घोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे खुलताबाद शहरात अतिक्रमण करणा-यांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. येथील न.प.च्या जागेवर अतिक्रमण करण्याची स्पर्धाच लागली असून, मोक्याची जागा असलेला आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीचा परिसर पूर्णत: अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या जागेवर दोन्ही बाजूंनी टपºयांचे अतिक्रमण झालेले आहे. मात्र, न.प. प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. या कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.येथील आठवडी बाजारातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. याठिकाणी सर्रासपणे शटर लावून पत्र्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.प्रारंभी, एक-दोन टपºया थाटण्यात आल्या होत्या. मात्र, कुणीही कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास येताच आणखी १५ ते २० जणांनी येथे टपºया लावून नगर परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केले आहेत.विशेष म्हणजे येथील अतिक्रमणे ही थेट जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंत गेली आहेत. मात्र, तरीही नगर परिषद प्रशासनातील अधिकारी कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत. न.प. कारवाई करण्याची तसदी घेत नसल्याने अनेक जण पक्के बांधकाम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर मुंडी टेकडी परिसरातील पाणीच्या टाकी परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अनेकांनी तर पत्र्याची घरेही थाटली आहेत. लवकरच याकडे लक्ष न दिल्यास ही जागा अतिक्रमणधारक आपल्या नावे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
खुलताबादेत अतिक्रमण करणा-यांना ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:31 AM