विशाल सोनटक्के । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी वेळ, कमी पैशात हक्काचे पैसे देणारा पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे पाहिले जाते. या व्यवसायाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम करण्याचे काम केले आहे. मात्र मागील काही वर्षांत जिल्ह्यातील शासकीय आणि सहकारी केंद्रांना घरघर लागली असून, खाजगी दूध संकलकांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. शासकीय केंद्रामध्ये प्रतिदिन ५२५, सहकारी केंद्रामध्ये प्रतिदिन ९ हजार ५३८ लिटर दुधाची प्रतिदिन हाताळणी होत असताना जिल्ह्यातील खाजगी संकलन केंद्राकडे मात्र दररोज सव्वाचार लाखांहून अधिक लिटर दुधाचे संकलन केले जात असल्याचे खुद्द शासकीय आकडेवारीच सांगते.सिंचनाचे मर्यादित क्षेत्र. त्यामुळे जिल्ह्यातील शेती पावसावरच अवलंबून आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात पशुधनाची संख्या चांगली आहे. जिल्ह्यात ४ लाख ९४ हजार ६८३ गाय वर्गाचे पशुधन आहे, तर १ लाख ७२ हजार ५६४ म्हैस वर्ग असून, १ लाख ७८ हजार ६६० एवढी शेळ्यांची संख्या आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक ८९ हजार ३५२ गायी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असून, उस्मानाबाद तालुक्यातही ७७ हजार ३०६, तुळजापूर ५७ हजार ३७८, कळंब ८५ हजार ७७०, वाशी ५१ हजार ११६, परंडा ५६ हजार ७८३, लोहारा २७ हजार ४७, तर उमरगा तालुक्यात ४९ हजार ९३१ गायींची संख्या आहे. म्हैस वर्ग पशुधनाचा विचार केला असता, जिल्ह्यात सर्वाधिक म्हशी तुळजापूर तालुक्यात आहे. तेथे ४१ हजार ५१८ पशुधन आहे. त्या पाठोपाठ उस्मानाबाद तालुक्यातील शेतकरीही तब्बल ३९ हजार १२० म्हशींचे पालन करतात. कळंब तालुक्यात २० हजार ९७१, वाशी १० हजार २१९, भूम १२ हजार २७९, परंडा १० हजार ९९३, लोहारा १४ हजार ९२१, तर उमरगा तालुक्यातील शेतकरी २२ हजार ५४३ म्हशींचे संगोपन करतात. पशुधनाची ही संख्या पाहता जिल्ह्यात दुग्ध उत्पादन तसेच प्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत. मात्र याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.
खाजगी दूध संकलकांना ‘अच्छे दिन’
By admin | Published: May 27, 2017 11:48 PM