- संजय जाधव.
पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठ्यात एक जून पासून साडेपाच टिएमसीने भर पडली आहे. मराठवाड्यातील धरणापैकी सर्वाधिक जलसाठ्याची वाढ जायकवाडी धरणात झाली असून जायकवाडी नंतर पैन गंगा प्रकल्पात साडेतीन टिएमसी ने जलसाठ्यात वाढ झाली आहे. आज रोजी मराठवाड्यातील धरणात एकूण जलसाठा ३९% असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) चे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाचा जलसाठ्यात १५८.१६१ (५.५७ टिएमसी) ने वाढ झाली असून धरणाचा जलसाठा ४०.२२ टक्के झाला आहे. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा ११६१ .२०८ दलघमी (५६.८९ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा ८७३.१०२ दलघमी (३०.८२ टिएमसी) झाला आहे.असे जायकवाडीचे धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे यांनी सांगितले.
जायकवाडीच्या जलसाठ्यात स्थानिक पावसाने सात जुलै पर्यंत एवढी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गत वर्षी आजच्या तारखे पर्यंत जायकवाडी धरणावर २५ मि मी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा २५८ मि मी पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षी पूर्ण पावसाळ्यात जायकवाडी धरणावर एकूण पाऊस ४९६ मि मी ईतका झाला होता. मात्र, यंदा पाच जुलैपर्यंत धरणावर एकूण २५८ मि मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, शेवगाव, नेवासा, गंगापूर, पैठण, वैजापूर, आदी तालुक्यात सातत्याने पाऊस होत असल्याने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात झालेली यंदाची वाढ लक्षणीय आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसावर व तेथील धरण समूहातून सोडलेल्या पाण्यावर जायकवाडी धरणास अवलंबून रहावे लागते. यंदा मात्र नाशिकचे पाणी अद्याप जायकवाडीत आलेले नसताना जलसाठ्यात झालेली वाढ मराठवाड्यासाठी दिलासा दायक आहे.
मराठवाड्यातील धरणात ३९% जलसाठामराठवाड्यातील मांजरा व सिना कोळेगाव प्रकल्प वगळता ईतर प्रकल्पात चांगला जलसाठा आहे. मराठवाड्यातील धरणाची एकूण जलक्षमता ५१५२.७९ दलघमी एवढी असून आज रोजी या धरणात २०३२. ०९ दलघमी ईतका जलसाठा आहे. दरम्यान गोदावरी नदीवरील राजा टाकळी व लोणी सावंगी बंधारे पूर्ण भरल्याने या बंधाऱ्यातून खाली पाणी सोडण्यात आल्याचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील धरणाची टक्केवारी...जायकवाडी ४०.२२%, निम्न दूधना १३.६६%, येलदरी ६३.२८%, सिध्देश्वर ३४.१८%, माजलगाव २३.७२%, पैनगंगा ५२.३९%, मनार ४७.५२%, निम्न तेरणा २.३७% विष्णूपुरी ६८.३५%, असा जलसाठा आहे.बीड जिल्ह्यातील मांजरा धरणात यंदा ९.३४ दलघमी पाण्याची आवक झाली असली तरी मांजरा धरणाचा जलसाठा आज रोजी उणे ( - १२.७९%) आहे. तर सिना कोळेगाव धरणाचा साठा (- ९५.७९) असा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मांजरा व सिना कोळेगाव वगळता ईतर प्रकल्पात समाधानकारक जलसाठा असून मोठा पावसाळा अद्याप बाकी असल्याने मराठवाड्यातील सर्व प्रकल्पात यंदा अपेक्षित जलसाठा होईल अशी अपेक्षा अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.