औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल १० महिन्यांनंतर ३ फेब्रुवारीपासून इंडिगोची अहमदाबाद- औरंगाबाद- अहमदाबाद विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेमुळे औरंगाबादहून अहमदाबादेत अवघ्या दीड तासात पोहोचता येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी औरंगाबादहून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर देशभरातील विमानसेवा ठप्प झाली होती. कोरोनाचा विळखा सैल झाल्यानंतर औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली. काही दिवसांपासून अहमदाबादसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर ३ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. अहमदाबादला वाहनाने जाण्यासाठी बराच वेळ जातो; परंतु अहमदाबादला थेट विमान सुरू होणार असल्याने हा प्रवास दीड तासावर येणार आहे. विमान प्रवाशांबरोबर व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, इंडिगोचे औरंगाबाद-अहमदाबाद विमान दरराेज राहील. ७८ आसनी एटीआर विमानाद्वारे ही सेवा दिली जाईल. यापुढे औरंगाबादला नागपूर, पुणे आणि इंदूरची हवाई कनेक्टिव्हिटी मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल.
असे राहील वेळापत्रकइंडिगोचे विमान अहमदाबाद येथून दररोज सकाळी १०.४५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.१५ वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.