औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील भक्ती वाघिणीने शनिवारी सकाळी पहाटे दोन गोंडस पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला. दोन्ही बछडे आणि आई सुखरूप आहेत.
प्राणीसंग्रहालयामध्ये पांढऱ्या रंगाचा वीर वाघ आणि पिवळ्या रंगाची भक्ती वाघीण यांची जोडी आहे. पहाटे भक्ती वाघीनीने दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला. भक्ती या वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भक्तीने बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिच्यामध्ये मातृत्वाची भावना दिसून येत नसल्याचे आढळून आले. ती बछड्याची काळजी घेत नव्हती तसेच स्वतः दूध पाजत नसल्याचे दिसून आले. बछड्यांना ठराविक अंतराने दूध पाजणे गरजेचे असते त्यामुळे बछड्यांना आवश्यक त्या वेळी बकरीचे दूध पाजण्यात येत आहे.
भक्ती वाघिणीच्या व बछाडयांच्या हालचालीची माहिती होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाघिणीची व बछड्यांची देखभाल करण्यासाठी २४ तास केअर टेकर ठेवण्यात आले आहेत. वाघिणीच्या पिंजऱ्यात केअर टेकर शिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही. वाघिणीची व बछड्यांची काळजी घेतली जात आहे. यापूर्वी प्राणिसंग्रहालयात एक नर व दोन मादी असे एकूण तीन पांढरे वाघ होते. आता या बछडयामुळे पांढऱ्या वाघाची संख्या पाच झाली आहे. प्राणिसंग्रहालयात पिवळ्या वाघांची संख्या अकरा झाली असल्याची माहिती प्राणी संग्रहालय संचालक विजय पाटील यांनी दिली.