छत्रपती संभाजीनगर : फळांचा राजा आंब्याचे वेध सर्वांना लागले आहेत. सर्व खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘बदाम’ आंबा बाजारात दाखल झाला आहे. येत्या आठवडाभरात ‘लालबाग’ आंब्याचेही आगमन होणार आहे.
थंडी कमी होताच अबालवृद्ध ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात. तो आंबा बाजारात दाखल झाला आहे. आता एकापाठोपाठ एक असे जून महिन्यापर्यंत सर्व प्रकारचे आंबे येतील. मात्र, यंदा सर्वप्रथम बाजारात दाखल होण्याची बाजी ‘बदाम’ आंब्याने मारली आहे. मागील वर्षी ‘लालबाग’चे सर्वांत पहिले आगमन झाले होते.
काय किलो विकतोय बदामकर्नाटक राज्यातून बदाम आंब्याची आवक झाली आहे. सध्या ३०० ते ३५० रुपये किलोने हा आंबा विकला जात आहे. पैठणगेट परिसरातील फळविक्रेत्यांकडे आंबा दिसताच खवय्यांनी तो खरेदीही केला.
मार्चमध्ये हापूस, मेमध्ये केशर आंबाबदामनंतर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ‘लालबाग’ आंब्याची आवक सुरू होईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा, तर मेमध्ये गुजरातचा केशर व अखेरीस मराठवाड्यातील केशर आंब्याचे बाजारात आगमन होईल.
मुंबईत हापूसची पहिली पेटी दाखलमुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत रत्नागिरीतील हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या. त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. सुमारे १० ते १५ हजार रुपयांना पेटी विकल्या गेली.