छत्रपती संभाजीनगर : वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी १ मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू झाली. दरम्यान, १७ मार्च ही नोंदणीची अंतिम मुदत होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यात १७ हजार ४०४ पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी नोंदणी केली. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता २५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच राबविले जात असते. मात्र, यंदा या प्रक्रियेस मोठा विलंब झाला. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी २३ जानेवारीपासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील ५४६ शाळांनी नोंदणी केली. त्यानंतर १ मार्चपासून विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली. ही मुदत १७ मार्चपर्यंत होती. दरम्यान, एकाचवेळी नोंदणीसाठी पोर्टलवर भार वाढल्यामुळे ते अनेकदा हँग पडत होते. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यास प्रवेशाच्या नोंदणीपासून वंचित राहिले. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी २५ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे.
जिल्ह्यात ५४६ शाळांनी ‘ आरटीई ’ साठी केली नोंदणी
- नोंदणी केलेल्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ४ हजार ६९ जागा उपलब्ध
- १७ मार्चपर्यंत १७ हजार ४०४ विद्यार्थ्यांसाठी झाली नोंदणी
- २५ मार्चपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ