औरंगाबाद : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतीची सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात देशातील १३ शहरांमध्ये फाईव्ह जी मोबाइल सेवेला सुरूवात झाली. ३१ मार्चपर्यंत औरंगाबाद शहरात फाईव्ह जी मोबाइल सेवेला सुरूवात होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन (सीएमआयए)च्या वतीने सोमवारी ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ या कार्यक्रमाचे आयोजन जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री वैष्णव बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी खासदार राजकुमार धूत, उद्योजक एन. के. गुप्ता, राम भोगले, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांच्यासह विविध उद्योजक, सीएमआयए, मसिआ आणि जिल्हा व्यापारी महासंघ, इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधानांनी दिलेल्या ‘टार्गेट’मुळे आपल्या अभियंत्यांनी फोर जी, फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केले. पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२३पर्यंत २०० शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेला सुरूवात होणार असून, यात औरंगाबादचा समावेश आहे. लातूर येथे रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ महिन्यांत या प्रकल्पातून रेल्वेच्या कोचच्या उत्पादनाला सुरूवात होईल. ऑरिकसह येथील उद्योगांच्या क्षमतेचा विचार करून देशात येणाऱ्या उद्योगांना ऑरिक एक चांगला पर्याय आहे. उत्सव माछर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सीएमआयए सचिव अर्पित सावे, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, सौरव भोगले, अथर्वेशराज नंदावत यांनी पुढाकार घेतला.
प्रास्ताविकात सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता आणि येथील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी येथे डिजिटल डेटा सेंटर उभारण्याची मागणी केली. येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री सर्वोत्तम काम करत असल्याने हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प आल्यास या क्षेत्रात ‘बूम’ येईल, असे सांगितले. शिवाय पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशीपवर काम करण्याचा इंडस्ट्रीला अनुभव आहे. यामुळे पीपीपी मॉडेलवरील प्रकल्पावरही काम करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.