औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नमामि गंगा योजनेत औरंगाबाद शहरातील खाम आणि सुखना नदीचा समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत लवकरच खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात नागरिकांना आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल, अशी माहिती गुरुवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
मागील वर्षभरापासून महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी परिषद आणि शहरातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सात किलोमीटर लांब नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. लोखंडी पुलाजवळ सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी महापालिकेने आजपर्यंत एक रुपयाही खर्च केला नाही. भविष्यात पात्रातील पाणी स्वच्छ करणे, ड्रेनेज जोडण्या बंद करणे इ. कामे करण्यात येणार आहेत. खाम नदीत वेगवेगळ्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी येते. हे कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करण्यात येतील. खाम नदीत म्हणजेच हर्सूल तलावात बाराही महिने पाणी साचून राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास नागरिक आणि पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येईल. यासंदर्भातील डीपीआर लवकरच महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.
यापूर्वी सलीम अली सरोवरात प्रयत्न अयशस्वीमहापालिका प्रशासनाने यापूर्वी सलीम अली सरोवरात बोटिंगचा प्रयोग केला होता; मात्र तो काही महिन्यांतच बंद पडला. सरोवरातील दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच महापालिका प्रशासन बोटिंगचा विचार करू शकते. सरोवराशी संबंधित एक याचिका खंडपीठात दाखल आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणताही निर्णय घेता येत नाही.