कायगाव : जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात देश विदेशातील पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे येथे हे पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने पर्यटकांना सोयीस्कर असलेल्या जुने कायगाव येथे पक्षी निरीक्षण केंद्र उभारले जाणार आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी मोहन नाईकवडी यांनी दिली.
वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलेल्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी जुने कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरात त्यांनी स्थानिक नागरिक आणि संस्थानच्या विश्वस्त मंडळाची भेट घेत परिसराची पाहणी केली. राज्य शासनाने जायकवाडी परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केल्याने हा भाग वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा परिसर शांतता परिसर म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे या भागांतील कायदेशीर नियमन करण्याची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे आहे. रामेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हाॅटेल्स उभारण्यात आले आहेत. तसेच, जवळपासच्या शासनाच्या जागांवर ताबा करून अवैध वाहनतळ सुरू आहेत. ही सर्व अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे आदेश यावेळी विभागीय वनाधिकारी मोहन नाईकवडी यांनी दिले. जायकवाडी बॅकवॉटरकाठी अवैधरीत्या चालणाऱ्या व्यवसायावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
तसेच काही जण स्वतःच्या फायद्यासाठी जवळच्या कारखान्याचा कचरा गोदावरी नदीकाठी आणून जाळत आहेत. त्यामुळे नदी आणि परिसराचे प्रदूषण होत आहे. हे रोखण्यासाठी अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, वनरक्षक नारायण दराडे, रामेश्वर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.
जायकवाडी पक्षी अभयारण्यात विकासकामे करणारयेत्या काळात जायकवाडी पक्षी अभयारण्यात विविध विकासकामे केली जाणार असून, देशभरातून याठिकाणी पर्यटक येतील, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय महामार्गावर असल्याने पर्यटकांना सोयीस्कर असलेल्या जुने कायगाव येथे पक्षी निरीक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यातून स्थानिक तरुणांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही नाईकवडी यांनी सांगितले.