औरंगाबाद : औरंगाबादकरांना आता रेल्वेने दररोज थेट पुण्याला जाता येणार आहे. नांदेड - हडपसर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा अखेर विस्तार पुण्यापर्यंत करण्यात आला असून, ४ जुलैपासून ही रेल्वे दररोज धावणार आहे. या रेल्वेची वेळही बदलण्यात आली आहे. रात्री प्रवास सुरू केल्यानंतर पहाटे ५.३० वाजता पुण्यात पोहोचता येणार आहे.
जानेवारीत नांदेड - पुणे द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचे रुपांतर नांदेड - हडपसर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. या रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला एलएचबी कोचेस लावण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकावर नियोजित वेळेत रेल्वे थांबण्यासाठी प्लॅटफाॅर्म उपलब्ध नसल्याने हडपसर येथेच थांबा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, हडपसर ते पुणे स्टेशन दरम्यान लोकल नसल्याने शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड अथवा लोणावळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. ‘लोकमत’ने २८ फेब्रुवारी रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित करून ही बाब समोर आणली.
विशेष म्हणजे आता ही रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्री धावणार आहे. नांदेड - पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकावरून दररोज दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पुणे स्टेशनला पोहोचेल. तर पुणे - नांदेड एक्स्प्रेस पुणे स्टेशनवरून रात्री ९.३५ वाजता सुटेल आणि सकाळी १०.२० वाजता नांदेड येथे पोहोचेल.
औरंगाबाद स्थानकावरील वेळनांदेड - पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रात्री ८.२० वाजता येईल. रात्री ८.२५ वाजता ही रेल्वे रवाना होईल आणि पुण्याला पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. पुणे - नांदेड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहाटे ५.०५ वाजता येईल आणि ५.१० वाजता नांदेडकडे रवाना होईल.