छत्रपती संभाजीनगर : तब्बल ९७ दिवसांनंतर अखेर १ जुलैपासून इंडिगोकडून पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळेत मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ३ महिन्यांपासून पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची मुंबई विमान प्रवासासाठी होणारी गैरसोय संपणार आहे. सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी पुन्हा शहरात परतणे शक्य होणार आहे.
इंडिगोने २६ मार्चपासून सायंकाळी उड्डाण घेणारे मुंबईचे विमान अचानक बंद केले. त्यामुळे प्रवाशांना विमानाने मुंबईहून शहरात येण्यासाठी आणि शहरातून मुंबई गाठण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत होता. शहरातील विमानसेवेच्या अवस्थेविषयी ’लोकमत’ने ‘विमानसेवा जमिनीवर’ ही वृत्तमालिका प्रकाशित करून विमानसेवेसाठी पाठपुरावा केला तेव्हा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलिल यांनी मुंबईसाठी सायंकाळचे विमान पुन्हा सुरू होईल, असे सांगितले होते.
आजघडीला मुंबईसाठी एअर इंडिया आणि इंडिगोकडून सकाळच्या वेळेतच विमानसेवा आहे. त्यामुळे सकाळीच विमानतळावर जावे लागते. परंतु आता १ जुलैपासून सकाळच्या वेळेतील दोन विमानांबरोबर सायंकाळीही मुंबईसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.
मुंबईच्या सायंकाळच्या विमानाचे वेळापत्रक- मुंबईहून सायं. ६.१० वाजता उड्डाण आणि सायं.७.२० वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन.- छत्रपती संभाजीनगरहून रात्री ७.५० वाजता उड्डाण आणि रात्री ९ वाजता मुंबईत पोहोचणार.
सर्वांच्या प्रयत्नांमुळे यशसर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबईची सायंकाळची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. हा सगळ्यांचाच विजय आहे. अहमदाबाद आणि उदयपूर विमानसेवा सुरू होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन
आता ८ विमानांची ये-जामुंबईसाठी सायंकाळच्या विमानाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. मुंबईचे सायंकाळचे विमान सुरू झाल्यानंतर दिवसभरात ८ विमानांची ये-जा म्हणजे १६ उड्डाणे होतील.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ