छत्रपती संभाजीनगर : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र ५ हजार ८१२ कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुले देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी अलीकडच्या दोन महिन्यांत ५ हजार ४५२ कुटुंबांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून जवळपास साडेतीन हजार कुटुंबांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
ओबीसी तसेच विशेष मागास प्रवर्गातील बेघर, तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर असावे, यासाठी पाच महिन्यांपूर्वी मोदी आवास योजना अंमलात आली. पंतप्रधान आवास प्लस योजनेच्या प्रतीक्षा यादीत नावे असलेल्या ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील कुटुंबांना या याेजनेद्वारे तीन टप्प्यांत घरकुले देण्याची शासनाची योजना आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ८१२ कुटुंबांना घरकुले देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सप्टेंबरपासून सुरू झाली. सुरुवातीला ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून या योजनेबाबत अनास्थाच दिसून आली. मात्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी बीडीओ, ग्रामसेवकांना सूचना देऊन लवकरात लवकर पात्र कुटुंबांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासंबंधी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर अलीकडच्या दोन महिन्यांत ही प्रक्रिया गतिमान झाली.
आतापर्यंत ५ हजार ४५२ कुटुंबांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अर्थात ९३ टक्के प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यापैकी साडेतीन हजार कुटुंबांना लवकरच कामे सुरू करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे.
प्रत्येकी १ लाख २० हजारांचा निधीया योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याशिवाय रोजगार हमी योजनेंतर्गत ९० दिवसांची मजुरीदेखील दिली जाणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्टछत्रपती संभाजीनगर : १८७फुलंब्री : ३९१सिल्लोड : ६१३सोयगाव : ३७६कन्नड : ४२८खुलताबाद : २७६गंगापूर : १०५५वैजापूर : ११४७पैठण : १३३९