औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे सुमारे १९ महिन्यांपासून बंद असलेले सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय शुक्रवारपासून (दि.१२) खुले करण्यात येणार आहे. बच्चेकंपनीसोबत येणाऱ्या १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येईल. लहान मुलांसह सर्वांना मास्क अनिवार्य असेल, असे मनपाचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.
मराठवाड्यात एकमेव असे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय हे आबालवृद्धाचे आकर्षण आहे. प्राणिसंग्रहालयातील १४ वाघ हे सर्वांचे मुख्य आकर्षण आहे. उद्यानात आकर्षक पुतळे उभारून नवीन खेळणी बसविण्यात आली आहे. याशिवाय प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबट्या, तरस, निलगाय, हरीण, मगर, शहामृग, वानर आदी प्राणी आहेत.
मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद करण्यात आले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसासाठी उद्यान उघडण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढताच उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा ऑनलाईन, बाहेर फिरणे बंद, त्यातच सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद असल्यामुळे बच्चे कंपनीच्या विरंगुळ्याला ब्रेक लागला होता. आता उद्यान व प्राणीसंग्रहालय खुले करण्यात येणार असल्याने लहान मुलांसह इतरांच्या गर्दीने सिध्दार्थचा परिसर गजबजणार आहे.
महापालिकेने काढले परिपत्रकमनपा उपायुक्त सौरभ जोशी यांनी परिपत्रक काढले असून १२ नोव्हेंबरपासून सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटक व बालगोपाळांसाठी खुले केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उद्यान सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत आणि प्राणिसंग्रहालय सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले राहील. १८ वर्षावरील व्यक्तींना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय आत प्रवेश मिळणार नाही. लहान मुलांसह सर्वांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे जोशी यांनी परिपत्रकात म्हटले आहे.