औरंगाबाद : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची यादी अपडेट करण्यात राज्यात अव्वल ठरलेल्या औरंगाबाद जि. प.च्या मागणीनुसार जिल्ह्यास प्राप्त घरकुलांचा कोटा २६१२ ने वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १५ हजार ४८ बेघरांना हक्काचे घरकुल मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थीला शासनाकडून १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. एवढेच नव्हे तर घरकुल बांधकामासाठी वाळू अल्पदरात उपलब्ध होऊ शकते. बेघरांना हक्काचे घरकुल देणाऱ्या या योजनेंतर्गत घरकुल मिळावे, याकरिता जिल्ह्यातील २ लाख ६० हजार नागरिकांनी अर्ज केले होते. या यादीतील अपात्र लोकांची नावे वगळण्याची प्रक्रिया नुकतीच युद्धपातळीवर राबविण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ४३६ लाभार्थींना घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट होते.
घरकुलाच्या यादीतील अपात्र लोकांची नावे वगळून जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ८६८ ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गरजूंची घरकुलासाठी निवड करून त्याच्या खात्यात घरकुलाचा पहिल्या हप्त्याची रक्कम वर्ग केली जात आहे. जिल्ह्यातील घरकुलांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी विनंती प्रशासनाकडून शासनास करण्यात आली होती. शासनाने जिल्ह्याचा कोटा २६१२ ने वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील १५,०४८ गरजूंना घरकुल मिळेल. प्राप्त कोटा तालुकानिहाय विभागण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक संगीतादेवी पाटील यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आगामी काही दिवसांत पात्र लाभार्थींच्या खात्यावर घरकुलाचा पहिल्या हप्त्याची रक्कम ऑनलाइन जमा केली जाईल. या गरजूंनी तत्काळ घरकुलाचे बांधकाम करावे, आणि पावसाळ्यापूर्वी त्यांनी हक्काच्या घरात राहायला जावे, यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
तालुका आधी मंजूर घरकुल-- वाढीव घरकुलाची संख्याऔरंगाबाद --१०२७-----------३०२गंगापूर- १८०६-------------१९५कन्नड--- २०२४------------१९५खुलताबाद=---३५७----५२पैठण--- १५८९------२९३फुलंब्री--- ८८५----१९१सिल्लोड--- २१४४--- ६६१सोयगाव--- ६५६---- १७२वैजापूर---- १९४८----४६१