छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारावासीयांना नगर भूमापन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. साताऱ्यातील ४ ते ४३ अशा ४० सर्व्हेमधील जवळपास २५०० मालमत्तांना पीआर कार्ड (मालमत्ता पत्रक) दिले जाणार आहेत. जवळपास १० हजार जणांना याचा लाभ होईल, अशी माहिती शहर भूमापन अधिकारी समीर दाणेकर यांनी दिली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १२२ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव गावठाण हद्दीत सातारा भागातील ४० गटांचा समावेश केला आहे. सर्व्हे क्रमांक ४ ते ४३ असे जवळपास ४० गट त्यात आहेत. आजवर त्या भागाचे मालमत्तापत्रक उघडले नव्हते. आता कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे. पीआर कार्ड देण्यासाठी १ वर्षाहून अधिक कालावधी लागेल. मालमत्तापत्रक मिळाल्यास नागरिकांची अनेक अडचणींतून सुटका होईल. पीआर कार्ड मालकी हक्काचा सबळ पुरावा असून, त्यासोबत वेगळा नकाशाही तयार होतो. गृहकर्ज मिळण्यात अडचण येत नाही. मालमत्ता विक्री, हस्तांतरण सोप्या पद्धतीने होते. सातबाऱ्यावर मालमत्ता पत्रकावरील जुन्या नोंदींसह नवीन नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित होण्याचा प्रवास लक्षात येताे.
नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहनसाताऱ्यातील ४ ते ४३ या गटांतील मालमत्तांना पीआर कार्ड देणे सुरू केले आहे. नागरिकांनी मालकी हक्कांच्या कागदपत्रांसह नगर भूमापन कार्यालयात अर्ज करावेत. कागदपत्रांची छाननी करून प्रस्ताव भूमापन विभाग अधीक्षकांकडे सादर होईल. त्यांची परवानगी मिळताच पीआर कार्ड खुले करून नोंदी घेतल्या जातील. प्रत्यक्ष जागेची मोजणी, चौकशी केल्यावर पीआर कार्ड दिले जाईल.-समीर दाणेकर, नगर भूमापन अधिकारी