छत्रपती संभाजीनगर : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑफलाइनच होणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगरचे नाव वगळण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, यंदाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जाहीर झालेल्या यादीत छत्रपती संभाजीनगरचे नाव नसल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवार, २ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष अकरावीच्या प्रवेशाकडे लागले. यंदा महापालिका हद्दीतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन की ऑफलाइन, याबद्दल शिक्षण विभागाने आतापर्यंत जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
सन २०१७ पासून राज्यातील काही शहरांसोबत छत्रपती संभाजीनगरचा समावेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला होता. यामुळे शहरातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहात होत्या. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी, पालकांसाठी अत्यंत किचकट व वेळखाऊ असल्याचे बोलले जात होते. शहरात ऑनलाइन प्रक्रिया नको, या प्रक्रियेतील विलंब इतर अडचणींमुळे विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडे जात असल्यामुळे शिक्षक, संस्था चालकांमध्ये मोठी नाराजी होती. स्थानिक आमदारांनीही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नको, हेच धोरण अंगिकारले होते.
किती आहे प्रवेश क्षमता?जिल्ह्यात यंदा अकरावीची प्रवेश क्षमता ७२ हजार ८६० एवढी आहे. यात कला शाखेसाठी २९ हजार ३४०, विज्ञान शाखेसाठी ३६ हजार ४० आणि वाणिज्य शाखेसाठी ७ हजार ४८० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. दुसरीकडे, मार्च २०२३ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ५९ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील काही विद्यार्थी आयटीआय, तंत्रनिकेतन तसेच अन्य कोर्सेससाठी प्रवेश घेतील. त्यामुळे यंदाही अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहतील.