छत्रपती संभाजीनगर : एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर तिचा वापर कधी करायचा, याचा संपूर्ण अधिकार ग्राहकांना असतो. परंतु मोबाइलचा ‘डेटा’ खरेदी केल्यानंतरही त्यावर ग्राहकांचा म्हणजे मोबाइलधारकांचा अधिकारच नसल्याची परिस्थिती आहे. कारण रिचार्ज मारल्यानंतर दररोज ठरावीक डेटा वापरण्याची जणू सक्तीच होतेय. हा डेटा वापरला नाही तर तोही ‘छुमंतर’ होत असल्याची परिस्थिती आहे.
विविध कंपन्या, खासगी ऑपरेटर्सकडून वेगवेगळ्या रकमेचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. यात काॅलिंग, एसएमएस आणि ‘डेटा’चा समावेश असतो. दररोज एक जीबी, दीड जीबी, दोन जीबी, अशा प्रकारे ‘डेटा’चा वापर करण्याचे रिचार्ज प्लॅनमध्ये नमूद केलेले असते. यानुसार वापर झाला नाही तर शिल्लक ‘डेटा’ पुढच्या दिवशी, पुढच्या रिचार्जमध्ये समावेश का केला जात नाही, अथवा ग्राहकाला एकाच वेळी महिन्याचा ‘डेटा’ वापरण्याची मुभा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही कंपन्या शिल्लक ‘डेटा’ आठवड्याच्या शेवटी वापरण्यासाठी देतात, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठवड्याच्या शेवटी नाही तर ग्राहकांनी खरेदी केलेला ‘डेटा’ त्यांना कधीही वापरता आला पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.
अशी आहे ‘डेटा’ची स्थिती? एका कंपनीचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्यासाठी २८ दिवसांची मुदत दिली जाते. यानुसार मोबाइलधारकास ५६ जीबी ‘डेटा’ वापरण्यास मिळतो. पण दररोज २ जीबी ‘डेटा’ यानुसारच वापरण्याची सक्ती केली जाते. अनेक मोबाइलधारकांचा ‘डेटा’ वापर कमी असतो. दररोज वापरण्याच्या अटीने त्यांचा ‘डेटा’ एकप्रकारे गायबच होत असल्याची परिस्थिती आहे. मोबाइलधारकांना ५६ जीबी ‘डेटा’ केव्हाही वापरता आला पाहिजे, त्यांचा शिल्लक ‘डेटा’ पुढे ‘कॅरी फाॅरवर्ड’ झाला पाहिजे, अशी मागणी मोबाइलधारकांकडून होत आहे.
ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतातशिल्लक ‘डेटा’ पुढे कायम राहावा. एक तर ‘डेटा’चे रेट अवाढव्य आहेत. त्यातही त्याचा वापर झाला तर तो इतरांना विकण्याचाच प्रकार खासगी ऑपरेटर्सकडून होत आहे. ग्राहकांचा उरलेला ‘डेटा’ पुढे कायम राहिला पाहिजे. रोजच्या रोज वापरण्याची सक्ती नसावी. त्याबरोबर रिचार्जचा कालावधी २८, ५६ दिवस असे न राहता पूर्ण महिन्यानुसार असावा. परंतु खासगी ऑपरेटर्स ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नफा मिळवीत आहेत.- दीपक जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकाॅम एम्प्लाॅइज, बीएसएनएल