आमदारांकडून पंचनामा : एका पोत्यामागे तीन किलो धान्य कमीआष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे; परंतु या दुष्काळाचे जसे जमेल तसे भांडवल करून पैसे कमवित असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी आ.भीमराव धोंडे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता कडा येथील शासकीय धान्य गोदामाला अचानक भेट देऊन तेथील धान्याच्या गोण्यांचे वजन केले असता प्रत्येक गोण्यांमध्ये तीन किलो धान्य कमी असल्याचे आढळून आले.कडा येथील शासकीय गोदाममधून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत केले जाते; मात्र हे धान्य ज्यावेळी दुकानदारापर्यंत पोहोचते, त्यावेळी प्रत्येक गोणीत ५० किलोऐवजी २ ते ३ किलो धान्य कमी भरत असल्याची तक्रार काही दुकानदारांनी केली होती. सोमवारी दुपारी कडा येथील शासकीय गोदामास आ.धोंडे यांनी भेट दिली. सुमारे अडीच तास गोदामात थांबून सर्व नोंदीची तपासणी करीत भरलेल्या काही गोण्यांचे वजन केले. त्यावेळी तिथे बाहेरून आलेला गहू उतरून घेण्याचे आणि ते एकत्र करून गोण्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. उतरून घेतलेली गोणी ५० किलो वजनाची, तर स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणारी गोणी ४८ किलो वजनाची भरली. अशा दहा पंधरा गोण्या मोजल्या तर प्रत्येक गोणीत कमी धान्य असल्याचे निदर्शनास आले.आ.धोंडे यांनी तेथील गोदाम रक्षक किशोर जवंजाळ यांना याचा जाब विचारला; मात्र जवंजाळ हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार इकबाल सय्यद यांना बोलावून घेत सर्वांसमोर पंचनामा केला. दोषींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)धोंडे म्हणतात, काळा बाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाहीदुष्काळात सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळतात का, काही याची चौकशी करून धान्याचा काळाबाजार करणा-यांची गय केली जाणार नाही, असे आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले.दरम्यान झालेल्या सर्व प्रकारची चौकशी करून गोरगरीब लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्यांवर कारवाई करावी नसता आम्ही लोकशाही मार्गाने अंदोलन करून कारवाईस भाग पाडू, असा इशारा छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वाघुले यांनी दिला आहे.सदरील घडलेल्या प्रकरणाबाबत कडा येथील गोडाऊन सील करण्यात आले असून, गोडाऊनची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची रीतसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.- रामेश्वर गोरे, तहसीलदार आष्टी
धान्य वाटपात गोलमाल!
By admin | Published: May 03, 2016 11:59 PM