औरंगाबाद : अनिवासी भारतीय जयेश शहा यांची ८ कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक सोमनाथ विजयनाथ साखरे (रा. सिडको एन-३) विरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासाला गुन्हे शाखेने वेग दिला.
यासंबंधातील महत्त्वाची कागदपत्रे बँक आॅफ इंडियाकडून नुकतीच प्राप्त झाली. बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून कुणीतरी आपल्या नावे बनावट बँकेत खाते उघडून फसवणूक केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. यादृष्टीने आता तक्रारदाराची स्वाक्षरी घेऊन आणि बँकेतील कागदपत्रांच्या स्वाक्षरीची पडताळणी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून केली जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, अनिवासी भारतीय जयेश हसमुख शहा यांच्याकडून साखरे यांनी पुण्यातील खराडी येथील पवनसुत इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीसाठी जयेश यांच्याकडून १० कोटी रुपये कर्ज घेतले होते. २ आॅगस्ट २०१२ रोजी साखरे यांनी शहा यांच्याशी संपर्क साधून साडेसात कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी साखरे यांच्या सांगण्यावरून शहाने औरंगाबादेतील बँक आॅफ इंडियाच्या जालना रोडवरील शाखेत ७ कोटी ५० लाख रुपये बँकेत मुदत ठेव स्वरुपात ठेवले.
दरम्यान कुणीतरी बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शहा यांच्या नावे अन्य बचत खाते उघडून त्यांची मुदत ठेव मोडली. त्यांच्या परस्पर २ कोटी रुपये श्री साई नारायण प्लास्टिक प्रा.लि.च्या बँक खात्यात वर्ग केले. उर्वरित ५ कोटी ७९ लाख ३५ हजार १८५ रुपये एक वर्षासाठी परस्पर मुदत ठेव म्हणून जमा केली. एवढेच नव्हे तर पुन्हा त्यांच्या नावे बनावट बचत खाते उघडून मुदत ठेव मोडून बचत खात्यात रक्कम वर्ग केली. ही रक्कम परस्पर काढून फसवणूक करण्यात आल्याची तक्रार शहा यांनी जवाहरनगर ठाण्यात दाखल केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासाला गुन्हे शाखेने गती दिली. गुन्हे शाखेने मागणी केल्यानुसार बँकेने शहा यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे गुन्हे शाखेला दिली आहेत. आता तक्रारदार यांच्या स्वाक्षरीचे नमुने आणि शहा यांच्या नावे बनावट खाते उघडताना बँकेच्या फॉर्मवरील स्वाक्षरीची पडताळणी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सावंत यांनी दिली.
साखरे यांची गुन्हे शाखेकडून चौकशीदरम्यान गुन्हे शाखेने साखरे यांची दोन वेळा कसून चौकशी केली. चौकशीमध्ये आपले आणि शहा यांचे आर्थिक व्यवहार संपुष्टात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंध नसल्याचे साखरे यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले.