औरंगाबाद : रेकॉर्डवरील गुन्हेगार अबू बकर चाऊस हबीब सालेह (वय ४५, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) याची निर्घृण हत्या (Murder in Aurangabad ) करण्यात आल्याचे बुधवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आले. अबू बकर याचे डोळे काढण्यात आले होते. त्याच्या मानेवर १०० पेक्षा अधिक वार असल्याचे दिसून आले. या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावला. शहरात मागील तीन दिवसांत तीन हत्या झाल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत.
वोक्हार्ट कंपनीच्या चौकात अबू बकर चाऊस याचा मृतदेह नागरिकांना दिसला. एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. ठसे, श्वानपथकालाही बोलावण्यात आले. काही वेळातच उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. अबू बकर हा जिन्सी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. एम. सिडको, गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार उचलले. एम. सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही एक जण ताब्यात घेतला. त्याच वेळी जिन्सीच्या विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांना ही हत्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सय्यद समीर ऊर्फ स्टाॅयलो सय्यद शौकत याने केल्याची माहिती मिळाली. ठाकूर यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. उपायुक्त गिऱ्हे, निरीक्षक पोटे, ठाकूर आदींनी घटनास्थळी नेऊन त्याच्याकडून हत्येचा उलगडा करून घेतला. या प्रकरणी एम. सिडको पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक संजय मांटे करीत आहेत.
डोळे काढून खेळल्या गोट्याअबू बकर हा भाई म्हणून तर सय्यद समीर हा स्टायलिश म्हणून प्रसिद्ध होता. या दोघांची मंगळवारी रात्री रोशनगेट येथे भेट झाली. अबूच्या दुचाकीवरच दोघांनी चिश्तिया चौकातील एका वाइन शॉपमधून देशी दारू घेतली. मग आंबेडकरनगर येथे आले. दारू प्यायल्यानंतर नेक्सा सर्व्हिस सेंटर आणि वोक्हार्ट कंपनीजवळ त्यांच्यात वाद झाले. याच वेळी समीरच्या मोबाइलवर आईचा फोन येत होता. तो फोन अबू बकर उचलू देत नव्हता. त्यामुळे संतापून समीरने अबूकडे असलेला चाकू हिसकावून घेत सपासप वार केले. १०० पेक्षा अधिक वार मानेवर केले. नंतर अबूचे डोळे चाकूने काढले. ते काढून गोट्यासारखा खेळला असल्याचा कबुलीजबाब त्याने जिन्सी पोलिसांना दिला.
ना सीसीटीव्ही, ना लोकेशन ! थेट आरोपी ताब्यातया हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथके शोध घेत होती. जिन्सी पोलिसांच्या विशेष पथकाला अबू व समीर दुचाकीवर सोबत गेल्याची माहिती मिळाली होती. यावरूनच जिन्सी पोलिसांनी हत्येचा झटपट उलगडा केला.