औरंगाबाद : शहानूरवाडी परिसरातील झांबड कॉर्नर येथे माहेरी जाळून घेतलेल्या डॉ. साधना जगन्नाथ राऊत (डॉ. साधना चेरी रॉय-गायकवाड) यांचा उपचारादरम्यान आज सकाळी खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. ९ फेब्रुवारी रोजी माहेरी त्यांनी जाळून घेतले होते. शासकीय कर्करोग रुग्णालयात त्या बालरोगतज्ज्ञ तथा सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी सांगितले की, डॉ. साधना यांचा विवाह २३ नोव्हेंबर २०१६ रोजी डॉ. चेरी रॉय-गायकवाड यांच्यासोबत औरंगाबादेतील एका हॉटेलमध्ये झाला. २०१२ पासून ते घाटी रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांची बदली पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये झाली. तेथेच त्यांचे पती डॉ. चेरी रॉय हे कान-नाक आणि घसा विभागात कार्यरत आहेत. चार महिन्यांपूर्वी डॉ. साधना यांना सहयोगी प्राध्यापकपदी बढती मिळाली आणि त्यांची बदली औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालयात झाली. येथे रुजू झाल्यापासून त्यांच्या पतीनेही औरंगाबादेत बदली करून घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता, तर डॉ. साधना यांनीच पुणे येथे बदली करून घ्यावी, असे डॉ. चेरी -रॉय यांना वाटायचे. यावरून पती-पत्नीत कुरबुर होत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व नातेवाईक एकत्र बसणार होते.
दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी रात्री डॉ. साधना यांनी अचानक आई-वडिलांच्या घरी जाळून घेतले. या घटनेत त्या ७० टक्क्यांहून अधिक जळाल्या. यानंतर त्यांना तातडीने घाटीत हलविण्यात आले. तेथून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. बीड बायपास रोडवरील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास डॉ. साधना यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक वेव्हळ, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे हे तपास करीत आहे.
संपूर्ण उच्चशिक्षित कुटुंबडॉ. साधना यांची सासू डॉ. शेंडे-गायकवाड या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयात बायोकेमेस्ट्री विभागप्रमुख आहेत, तर सासरे डॉॅ. अरविंद गायकवाड हे घाटीतूनच सेवानिवृत्त झालेले आहेत. ते सध्या लोणी येथील प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. त्यांचे वडील शासकीय आयटीआय येथून राजपत्रित स्टेनो म्हणून निवृत्त झाले. त्यांना एक बहीण आणि भाऊ असून तेही उच्चशिक्षित आहेत.याविषयी बोलताना जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले की, डॉ. साधना यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविलेला आहे. या जबाबात त्यांनी स्वत:हून जाळून घेतल्याचे नमूद केले. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नव्हती.
अशी घडली घटना९ फेबु्रवारी रोजी रात्री डॉ. साधना यांनी पतीला फोन लावला. मात्र, काही कारणास्तव त्यांना फोन घेता आला नव्हता. यामुळे रागात साधना यांनी त्यांची खोली आतून बंद करून अंगावरील कपड्यांना आग लावली. यावेळी पॉलिस्टरच्या कपड्यामुळे आगीचा भडका जास्त उडाला. यावेळी संध्या यांनी आरडाओरड केल्यानंतर समोरच्या खोलीत बसलेल्या तिच्या आई-वडिलांनी तिला विझविले आणि तातडीने घाटीत दाखल केले. मात्र, या घटनेत त्या ७० ते ७५ टक्के भाजल्या होत्या.