औरंगाबाद : शुक्रवारी एका दिवसात औरंगाबाद, जालना व बीड तिन्ही जिल्ह्यांत ८८७ दस्तांची नोंदणी झाली असून, १ कोटी २० लाख रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला.
कोरोना काळात घरांची घटलेली मागणी वाढविण्यासाठी व राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने यापूर्वी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिली होती. त्यानंतर ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के सवलत देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत दस्त नोंदणीची रक्कम भरून पुढील ४ महिन्यांत उर्वरित प्रक्रिया करण्याच्या सवलतीचा व बँकेने कमी केलेल्या व्याजदराचा फायदा उचलण्यासाठी नागरिकांनी आज शुक्रवारी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी केली होती. दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३८१ दस्त नोंदणी झाली, तर जालना जिल्ह्यात ३०८ व बीड १९८ असे एकूण ८८७ दस्त नोंदणी झाली.
यातून औरंगाबाद जिल्ह्यात ६७ लाख ६० हजार २९० रुपयांचा महसूल जमा झाला. यातही सह. दुय्यम निबंधक कार्यालय नंबर ५ मध्ये सर्वाधिक २४ लाख ४ हजार ६२० रुपये तर नंबर ६ च्या कार्यालयात ११ लाख १८ हजार ४०० रुपये महसूल जमा झाला.
जालना जिल्ह्यात २९ लाख ३४ हजार ३३० रुपये तर बीड जिल्ह्यात २३ लाख ३२ हजार ७९० रुपये महसूल जमा झाला.
चौकट
सर्व्हर डाऊन, काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
दस्त नोंदणी करताना प्रशासन व नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्व राज्यात दस्त नोंदणी वाढल्याने ऑनलाइन सिस्टिमवर ताण येऊन सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. सातारा परिसरातील बीएसएनएलचे कार्यालय ज्या इमारतीत होते, ते मनपाने पाडले. याचा फटका तेथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील सर्व्हरला बसला. जळगाव रस्त्याचे काम सुरू आहे. बीएसएनएलची लाइन अनेकदा तुटत आहे, यामुळे तिथे सर्व्हर डाऊन होत आहे. याशिवाय ७ पेक्षा अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले, ते सुटीवर असल्याने त्यांच्या कामाचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. तरी आम्ही विक्रमी दस्त नोंदणी केली आहे.
सोहम वायाळ, मुद्रांक नोंदणी उपमहानिरीक्षक