औरंगाबाद : येत्या दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन होईल. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागांवर समाधान मानावे लागेल आणि त्यावर चांगल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावावी लागेल, असे रविवारी येथे राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.
ते संपर्क मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. आढावा बैठक असे स्वरूप होते; परंतु बघता बघता या बैठकीचे स्वरूप मेळाव्यात झाले. सुरुवातीला मंचावर मोठी गर्दी झाली. राजेश टोपे यांना निवेदने देण्यासाठी झुंबड उडाली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी टोपे यांच्यासोबत फोटो काढण्याची जणू स्पर्धाच केली. राजेश टोपे यांचा आज वाढदिवस होता, तसेच संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. त्यामुळे जो तो त्यांच्या सत्कारासाठी पुढे सरसावत होता; परंतु भंडारा येथे जी निष्पाप बालके जळून दगावली, त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे कुठलाही सत्कार घेणार नाही, असे जाहीर करून दगावलेल्या त्या बालकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्योती अभंग, आशा निकाळजे, विजया बनकर, राहुल सोनवणे, गुड्डू निकाळजे आदी माजी नगरसेवकांना टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.
नंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी, शहराच्या नामांतरापेक्षाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे सांगत याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी कोणतीही भूमिका नाही. वादग्रस्त प्रश्नांचा निर्णय घेण्यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मिळून कोअर कमिटी बनली आहे. ही कमिटी औरंगाबाद शहराच्या नामांतराबद्दल जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य राहील, असे स्पष्ट केले. प्रारंभी, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कदीर मौलाना, दत्ता भांगे, जयमलसिंग रंधवा, अमोल दांडगे, महेश उबाळे, सूरजितसिंग खुंगर, बादशहा पटेल, जफर बिल्डर, सय्यद मतीन, कैसर कुरेशी, भाऊसाहेब तरमळे, शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. मंचावर द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, मुश्ताक अहमद, छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, वीणा खरे, सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.