औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोलले जात आहे. विविध मंत्र्यांनी दिलेले प्रस्ताव फेटाळले जातात. सरकारचे कामकाज केवळ काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असून उर्वरित महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पदवीधर मतदार संघाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकारांची संवाद साधताना फडणवीस पुढे म्हणाले, राज्य सरकार केवळ काही जिल्ह्यांसाठी काम करत आहे. आमच्या सरकारच्या काळात मराठवाड्याला प्राथमिकता देण्यात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेस निधी दिला. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर केली. मात्र, या सरकारने वॉटर ग्रीड योजना स्थगित केली. जनता रस्त्यावर उतरेल म्हणून ही योजना रद्द न करता स्थगिती दिली. सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सरकार राज्यातील काही जिल्ह्यांपुरतेच काम करीत असून विदर्भ, मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काही लोक कुठेच शांत राहत नाहीतपदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप सोडली याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, काही लॉक कुठेच शांत बसत नाही.मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
सरकार मध्ये समन्वय नाहीसरकारमध्ये समन्वय नाही, ज्याला जे वाटेल ते बोले जाते. मंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावावर विचार न करता ते फेटाळले जातात, अशी टीकाही फडणवीस यांनी वीज बिल माफीच्या प्रस्तावावर निर्णय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केली. कोरोनासाठी उभारलेली यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित ठेवावी, लवकर लस येईल अशी आशा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आता दिवसा शपथविधी होणार एक वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधी बद्दल देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी, आता शपथविधी पहाटे पहायला मिळणार नाही, जाहीर करू असे म्हटले. तसेच असल्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.