औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शासनाने गुरुवारी तीन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली असून, त्यामध्ये आठ दिवसात खुुलासा सादर करावा अन्यथा नगरसेवकपद रद्द करण्यात येईल, असे म्हटले आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने बजावलेल्या नोटीसमुळे एमआयएमच्या गोटाळ एकच खळबळ उडाली आहे. ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे त्यात सय्यद मतीन (वॉर्ड क्र. २०-जयभीमनगर, घाटी), शेख जफर (वॉर्ड क्र. ६०- इंदिरानगर-उत्तर बायजीपुरा) आणि अपक्ष तथा एमआयएम समर्थक अजीम अहेमद (वॉर्ड क्र. ४३- शरीफ कॉलनी) यांचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये मावळते महापौर बापु घडमोडे यांची शेवटची सुभा सुरू असताना एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. महापौरांसमोरील राजदंड ओढत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. अजीम अहेमद यांनी सुरक्षा रक्षकाला धक्का देवून खाली पाडले होते. त्यानंतर जफर यांनी थेट महापौरांच्या अंगावर प्लास्टीकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. सय्यद मतीन यांनी राजदंड पळविला होता. या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. मतीन आणि अजीम यांना सिटीचौक पोलीसांनी अटकही केली होती. गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश तत्कालीन महापौर घडमोडे यांनी प्रशासनास दिले होते. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सभागृहात घडलेल्या घटनांचा सविस्तर तपशील शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला होता.
नोटीस येताच खळबळगुरूवारी महापालिकेत नियमीत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू असताना शासनाकडून पत्र प्राप्त झाले. मनपा सभागृहात गोंधळ घालणारे सय्यद मतीन, शेख जफर, अजीम अहेमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये आठ दिवसांमध्ये खुलासा सादर करावा अन्यथा आपले नगरसेवकपद रद्द का करण्यात येवू नये अशी विचारणाही करण्यात आली आहे. नोटीसमुळे एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आणखी चार जणांचा समावेशमनपा प्रशासनाने शासनाकडे एमआयएमच्या एकूण ८ नगरसेवकांचे अहवाल पाठविले आहेत. यातील काहींनी अतिक्रमण हटावात हस्ताक्षेप केला आहे. अधिका-यांवर हल्ला चढविणे, अतिक्रमण हटविताना विरोध दर्शविणे आदी आरोप एमआयएम नगरसेवकांवर आहेत. त्यातील तीन जणांनाच गुरूवारी शासनाने नोटीस बजावली आहे.