कोणतेही सरकारी काम सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोफत करणे बंधनकारक आहे. हे काम करण्यासाठी शासनाकडून त्यांना वेतन मिळते. असे असूनही सरकारी अधिकारी, कर्मचारी सामान्यांना वेठीस धरून लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याचा अनुभव पदोपदी नागरिकांना येतो. लाचखोर लोकसेवकांना पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत गतवर्षी १२६ लोकसेवकांना लाच घेताना पकडले, तर यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या आजच्या तारखेपर्यंत २९ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खासगी लोकांमार्फत लाचेची मागणी केली, तर काहींनी त्यांच्यामार्फत लाच घेतली. लाच घेणाऱ्या सर्वांच्या वयोगटाचा विचार केला असता ४१ ते ५० वयाच्या लोकसेवकांकडून लाचेची मागणी अधिक होत असल्याचे समोर आले. गतवर्षी २०२० मध्ये औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत ४१ ते ५० वयाच्या ४५ भ्रष्ट लोकांना एसीबीने पकडले. यात तीन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. यावर्षी दोन महिन्यांत २९ जणांवर कारवाई झाली. यात ४१ ते ५० वयाचे पाच लाचखोर आहेत, तर गतवर्षी २० ते ३० वयोगटातील सर्वांत कमी सहा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि १० खासगी व्यक्तींना लाच घेताना अटक झाली. ३१ ते ४० वयोगटातील २६ सरकारी बाबू आणि १० खासगी व्यक्तींना अटक झाली. सरकारी सेवेतील उतरता काळ म्हणून वयाची ५१ ते ६० हा कालावधी गणला जातो. या वयाचे २८ जण गतवर्षी लाचेच्या जाळ्यात अडकले होते.
===========
२०१८ ते २०२० दरम्यान एसीबीची अशी झाली कारवाई
- २०१८ ला १२२ लाचखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविले .
- २०१९ ला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १२४ सापळे रचून १६८ लाचखोरांवर अटकेची कारवाई केली.
===
=- २०२० ला औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये १२६ लाचखोरांवर गुन्हे नोंदवून लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले.
=======(======
कोट
तक्रार आल्यावर एसीबीकडुन तातडीने सापळा रचून कारवाई होते. गतवर्षी ४१ ते ५० वयाचे सर्वाधिक लोकसेवक लाच घेताना पकडले गेले हे खरे आहे. आम्ही वयाचा विचार न करता तक्रार येताच थेट कारवाई करतो. यामुळे लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध नागरिकांनी एसीबीकडे टोल फ्री क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करावी. लाचेची रक्कमही शासनाकडून तक्रारदाराला लगेच परत केली जाते.
== डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र एसीबी..