कळंब : कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे़ यातून राज्यात आजवर २४ ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज सहभागी झाला आहे़ मात्र, राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत उदासिन व वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याची टिका करीत, शासनाने समाजाचा अंत पाहू नये अन्यथा, समाजाला संघर्षाचा मार्ग पत्कराला लागेल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आ़ नितेश राणे यांनी दिला़स्वाभिमान संघटनेच्या वतीनेआयोजित ‘मराठा आरक्षण एल्गार’ मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज तर नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, विनोद गपाट, मराठवाडा संपर्क मनोज गरड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, माधव गंभीरे, भागवतराव धस, अतुल कवडे, प्रकाश भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती़आ.राणे म्हणाले, राज्यात आजवर २४ मुकमोर्चे निघाले आहेत. लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरूनही सरकारचे डोके ठिकाणावर आलेले नाही. या विक्रमी मोर्चाची काही जण ‘मुका मोर्चा’ म्हणून टिंगल करत आहे. यावरूनच हे सरकार व सरकारमध्ये सहभागी असलेले लोक मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी व आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. समाजात सहशीनशीलता आहे, या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला़ मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारने नारायण राणे समिती नेमली होती. यासमितीने राज्यातील अठरा लाख लोकांचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण केले. त्यानुसार मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व नौकरी आदी संदर्भातील स्थिती जाणून घेऊन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सध्याच्या सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी समाजाला आरक्षणापासून दूर रहावे लागले. नारायण राणे समितीचा अहवाल वस्तूनिष्ट असताना, बापट समितीच्या अहवालाचा गवगवा केला जात आहे. याविषयावर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन कमी पडत असून, या अंसतोषातूनच लोक रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले. यावेळी हभप प्रकाश बोधले महाराज, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ मेळाव्यासाठी ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, प्रकाश भोसले, विकास यादव, नाना खराडे आदींनी परिश्रम घेतले़
शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये
By admin | Published: October 11, 2016 12:24 AM