प्रशांत तेलवाडकर/ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 16 - वयाच्या १८ वर्षपूर्ण झाले की, दरवर्षी देशभरातील एक लाख बेवारस दिव्यांगांना सरकारच्या विशेषगृहातून हकलून देते. ते कसे जगणार याचा विचारही केला जात नाही. दुर्लक्षीत या दिव्यांगांना जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विशेषगृहात राहण्याचा, त्यांच्या पुर्नवसनाचा कायदा करीत नाही, तोपर्यंत मी कोणताही पुरस्कार स्विकारणार नाही, असे दृढनिश्चिय सेवाव्रती शंकरबाबा पापळकर यांनी येथे व्यक्त केला. १२३ दिव्यांगांचे पालकत्व स्विकारलेले सेवाव्रती शंकरबाबा पापळकर यांनी तिनदा पद्मश्री पुरस्कार नाकारला. याशिवाय विविध सामाजिक संस्थांनी जाहीर केलेले पुरस्कारही त्यांनी स्विकारले नाहीत. अमरावती जिल्ह्यातील ओझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचे संस्थापक असलेले पापळकर कामाच्या निमित्ताने रविवारी शहरात आले होते. ह्यलोकमतह्णशी बोलताना पापळकर यांनी बेवारस दिव्यांगाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त केली. मात्र, दिव्यांगाचे प्रश्नकडे समाज डोळसपणे पाहू लागला आहे, समाजामध्ये हा सकारात्मक बदल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. साधी राहणी असलेले पापळकर हे आता ७६ वर्षांचे आहेत. त्यांच्या संस्थेत १९९० ते १९९५ या पाचवर्षात १२३ बेवारस दिव्यांग मुल-मुली आश्रयाला आले होते. त्यात अंध,मुकबधीर,अपंग,मतिमंदांचा समावेश होता. या १२३ दिव्यांगांच्या आधारकार्डवर पिता म्हणून शंकरबाबा पापळकर यांचे नाव आहे. शंकरबाबा या दिव्यांगांमध्ये एवढे समरस झाले आहे की, कामानिमित्ताने राज्यात कुठेही ते गेले तरी तिथे एक दिवसापेक्षा ते जात राहू शकत नाही. एवढा त्यांना या दिव्यांग मुला-मुलींचा लळा लागला आहे. शंकरबाबा म्हणाले की, १२३ पैकी १४ दिव्यांग औरंगाबादेतील आहेत. ज्यांना बालन्यायालयाच्या आदेशाने आमच्या संस्थेत आश्रयाला पाठविण्यात आले. हे मुल-मुली जेव्हा संस्थेत आली तेव्हा अवघे १ वर्ष ते ५ वर्ष वयोगटातील होते. त्यातील १९ दिव्यांग मुलींचे लग्न लावण्यात आली. तर १२ मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे. जे मतीमंदपणाच्या बॉर्डरवर आहेत, अशा मतिमंद तरुणींचे लग्न आम्ही लावून दिले. मुकबधीर तरुणींचे लग्नही लावून दिले.शंकरबाबा म्हणाले की, या दिव्यांगांना त्यांचे आई-वडीलांनी सोडून दिले, भाऊ विचारत नाही. लग्न लावल्यावर समजा पुढे पतीने विचारले नाही पण पोटची मुल त्यांचा सांभाळकरतील. सलमा नावाच्या मतिमंद मुलीचे २००३ मध्ये लग्न लावून दिले. आज तिला एक सृदृढ मुलगा, मुलगी आहे ते शाळेत जातात व आपल्या आईची काळजी घेतात. दिव्यांगांनी संस्थेच्या परिसरात १५ हजार झाडे लावली आहेत. एवढेच नव्हे तर सर्व दिव्यांग एकामेकांची जीवापाड काळजी घेतात, हे सुद्धा शंकरबाबा यांनी अभिमानाने सांगितले. संस्थेत ९० दिव्यांग असे आहेत की, त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत त्यांना सांभाळणार आहे ते सुद्धा कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, असा निर्धारही शंकरबाबांनी व्यक्त केला.
सरकारने बेवारस दिव्यांगांची जबाबादारी घेतल्यावरच पुरस्कार स्वीकारेन - शंकरबाबा पापळकर
By admin | Published: July 16, 2017 7:33 PM