औरंगाबाद : कॅन्सर रुग्णांकरिता पेट स्कॅन तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना हजारो रुपये खर्च करून खासगी सेंटरमध्ये जाऊन ही महागडी तपासणी करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन शासकीय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर पेट स्कॅनची सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
औरंगाबादेतील आमखास मैदानाजवळील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने या सेंटरच्या विस्तारिकरणाचे काम सुरू आहे. एखाद्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर कॅन्सरच्या पेशी शरीरात कुठंपर्यंत पसरल्या आहेत, याविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी पेट स्कॅन ही एक अत्यंत महत्त्वाची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. घाटी रुग्णालय अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयात पेट स्कॅनची तपासणी करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन पेट स्कॅन करावे लागते. या तपासणीचा खर्च दहा ते पंधरा हजार रुयांपपर्यंत येतो. गरीब रुग्णांना ही तपासणी करणे परवडत नाही. शिवाय गरीब रुग्णांसाठी शासन दीड लाख रुपयांपर्यंत उपचाराचे पॅकेज देते. या पॅकेजमध्ये केवळ किमोथेरपी आणि रेडिओथेरपीचीच सुविधा उपलब्ध होते. कॅन्सर रुग्णाला कराव्या लागणाऱ्या अन्य तपासण्यांचा खर्च स्वत:च करावा लागतो. यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी शासकीय कर्करोग रुग्णालयात पेट स्कॅन उभारण्याची मागणी काही वर्षांपासून सुरू होती. रुग्णांची गरज लक्षात घेऊन शासकीय कर्करोग रुग्णालय प्रशासनाने अधिष्ठांतांमार्फत पेट स्कॅन मागणीचा प्रस्ताव पाठविला होता. पेट स्कॅनसाठी तज्ज्ञ डॉक्टर, स्वतंत्र कर्मचारी वर्गाची आवश्यकता असते. शिवाय पेट स्कॅन स्थापन केल्यानंतर देखभाल-दुरुस्तीसाठीही शासनाला स्वतंत्र खर्च करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन तेलंगणा सरकारच्या धर्तीवर पीपीपी तत्त्वावर औरंगाबादेत पेट स्कॅन स्थापन करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-----------------
चौकट
पीपीपी तत्त्वावरील पेट स्कॅन यंत्राकरिता केवळ शासकीय कर्करोग रुग्णालयात जागा आणि वीज उपलब्ध करण्याची जबाबदारी शासनाची असेल. पेट स्कॅन, तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ वर्ग आदी पेट स्कॅन स्थापन करणाऱ्या खासगी कंपनीचे असेल. शिवाय यंत्राची देखभाल व दुरुस्तीचा खर्चही कंपनीलाच करावा लागेल. रुग्ण तपासणीचे दर आणि अन्य बाबींचा प्रस्तावात समावेश असल्याचे सूत्राने सांगितले.
-------------------------------------------
चौकट
दररोज दाखल होणारे रुग्ण...
किमोथेरपी - ४० ते ४५
रेडिओथेरपी - ९० ते ९५
डे केअर - ४० ते ४२