लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर (औरंगाबाद) : जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता मिळविली असून, जनतेचा या सरकारवरील विश्वास उडत चालला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित कार्यक्रमात केले. लोकपाल बिलाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत जनांदोलन छेडण्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी सोमवारी येथे दिला.सिडको वाळूज महानगरातील मनजित सोसायटीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अण्णा हजारे आले होते. यावेळी सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकपाल बिलाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर हे बिल मंजूर करण्यात आले आहे; मात्र मंजूर करण्यात आलेले लोकपाल बिल अतिशय कमकुवत आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. भाजपच्या ‘अच्छे दिन’ घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडविली. जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळविली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते; मात्र सत्ता मिळवून साडेतीन वर्षे झाली तरी अद्याप एकाही व्यक्तीच्या खात्यावर १५ रुपये जमा झाले नसल्याचे सांगत ‘कुठे गेले तुमचे अच्छे दिन’ असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला -अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:14 AM